Take out the money earned on the lives of the people | Sarkarnama

जनतेच्या जिवावर कमावलेला पैसा बाहेर काढा : आमदार लहामटेंचे आव्हान कोणाला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 एप्रिल 2020

मी पाण्याचे राजकारण करणारा आमदार नसून, माझ्या काळात मी पाण्याचे योग्य नियोजन करत आहे. यापूर्वीच्या अनेक योजनांत मोठमोठे घोटाळे व कामे चुकीचे झाल्याचे दिसत आहे. योग्य वेळी याचा पाढा आपण वाचणार आहोत.

अकोले : ``त्यांनी कायमच पाण्याचे राजकारण करीत लोकांना झुलवत ठेवले आहे. त्या राजकारण्यांनी संकट काळात जनतेच्या जिवावर कमावलेला पैसा आता बाहेर काढुन पापातून उतराई व्हावे,`` असा टोला आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी विरोधकांना लगावला. 

पत्रकारांशी बोलताना आमदार लहामटे म्हणाले, ``पाण्याची उधळपट्टी म्हणून ओरडणाऱ्या त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना प्रश्न विचारावा, की कोणाच्या काळात पाणी वाटप करारावर सह्या झाल्या होत्या. मी पाण्याचे राजकारण करणारा आमदार नसून, माझ्या काळात मी पाण्याचे योग्य नियोजन करत आहे. यापूर्वीच्या अनेक योजनांत मोठमोठे घोटाळे व कामे चुकीचे झाल्याचे दिसत आहे. योग्य वेळी याचा पाढा आपण वाचणार आहोत,`` असे त्यांनी सांगितले. 

त्यांचे खाण्याचे दात वेगळे

शासनाच्या लाॅकडाऊन नियमांची पायमल्ली न करता अनेक गोरगरीब जनतेच्या घरकुलांची कामे चालू आहेत. ती अर्धवट स्थितीत पावसाळ्यापूर्वी राहू नयेत, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. तसेच अकोले तालुक्यातील कोणत्याही धरणाचा, तलावातील पाणीसाठ्याचा अपव्यय केला जाणार नाही. सबंधित अधिकारी वर्ग, स्थानिक लाभधारक क्षेत्रातील शेतकरी, जलतज्ज्ञ यांचा समन्वय ठेऊनच पाणी वाटपाच्या सूचना केल्या आहेत. मात्र ज्यांनी पाणी वाटपाच्या करारावर सह्या केल्या आहेत. आज ते पाण्याची उधळपट्टी होत असल्याची बोंब मारत आहेत. त्यामुळे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे, असा प्रकार विरोधकांमध्ये दिसत आहे. त्यांनी पाणी करारावर केलेल्या सहीचा विसर त्यांना एवढ्या लवकर कसा पडला, हा मोठा प्रश्न आहे, असा टोला डाॅ. लहामटे यांनी लगावला.

कोल्हा-घोटी मार्गाचे काम लवकरच

अकोले तालुक्यातील कोल्हार-घोटी महामार्गाचे काम त्वरीत चालू करावे, यासाठी १४ एप्रिल रोजी जिल्हाअधिकारी यांच्याशी बोलणे झाले आहे. राज्य सरकारकडुन यांच्याकडुन सहकार्य मिळाले आहे  आणि काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मात्र काही लोक फक्त प्रयत्न न करता जाहिरात करीत असल्याने ही गोष्ट हास्यास्पद आहे. मात्र आता जाहिरात करण्याशिवाय सध्या त्यांना काम नाही. अकोलेकर जनता ही कोरोनाचा सामना करत असताना या मंडळींना राजकारण सुचत आहे. जनतेला मदत करताना ही मंडळी कोठेही दिसत नाही. ज्या जनतेच्या जिवावर अनेक वर्ष सत्ता भोगली. त्यांना संकटकाळात मदत विरोधकांना का करावी वाटत नाही, यामुळे फक्त राजकारणासाठी अकोले तालुक्याच्या जनतेचा वापर काही मंडळी केला आहे, असा आरोप डाॅ. लहामटे यांनी केला. 

अकोल्यात लवकरच बेरोजगारांना मदत

अकोले तालुक्यात कोविड -१९च्या संकटकाळात अनेक नामांकित कंपन्या या मोठा आर्थिक व अन्यधान्यांचा वाटा उचलण्यास इच्छुक असून, लवकरच त्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे अकोले तालुक्याला कोविड-१९च्या संकटकाळात लाॅकडाऊनमुळे बेरोजगार कुटुंबाना आधार देण्याचा प्रयत्न होणार आहे, असे आश्वासन आमदार लहामटे यांनी दिले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख