शैक्षणिक वातावरण डाव्यांमुळे कलुषित, मोदींना पत्र 

 शैक्षणिक वातावरण डाव्यांमुळे कलुषित, मोदींना पत्र 

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचारानंतर देशभरातील अन्य विद्यापीठांच्या कॅम्पसमध्येही अस्वस्थता पसरू लागली आहे. विद्यापीठांमधील डाव्यांच्या राजकारणाला लक्ष्य करीत देशभरातील दोनशे अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ आणि कुलगुरूंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले आहे. 

"जेएनयू'मधील राड्याच्या पार्श्‍वभूमीवरच पंतप्रधानांना हे पत्र लिहिण्यात आल्याने त्याच्या राजकीय टायमिंगवरदेखील संशय व्यक्त होतो आहे. 

"जेएनयू'मधील हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज नऊ संशयितांना नोटिसा पाठविल्या असून, त्या सर्वांना चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने विद्यापीठामध्ये पाच जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी काही संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली होती. 

त्यामध्ये डाव्या आणि उजव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. दरम्यान, शिक्षणतज्ज्ञांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटले आहे की, ""दिल्लीतील जेएनयू ते जामिया मिलिया, अलिगडमधील मुस्लिम विद्यापीठ ते जादवपूर विद्यापीठ येथे ठिकठिकाणांवर घडलेल्या घटना पाहता देशातील शैक्षणिक वातावरण कलुषित केले जात असल्याचे दिसून येते. याला काही मोजकी डावी मंडळी कारणीभूत आहेत.'' 

या पत्रावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांमध्ये हरिसिंग गौर विद्यापीठाचे कुलगुरू आर. पी. तिवारी, दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू एच. सी. एस. राठोड आणि सरदार पटेल विद्यापीठाचे कुलगुरू शिरीष कुलकर्णी यांचा समावेश आहे. "शैक्षणिक संस्थांमधील डाव्या संघटनांच्या अराजकते'बाबतचे निवेदन, असे नाव या पत्राला देण्यात आले आहे. 

सरकारचा हात? 
दरम्यान, या पत्रामागेदेखील सरकारचाच हात असल्याची चर्चा आहे. जेएनयूमध्ये नागरिकत्व कायद्यावरून भडकलेले आंदोलन आणि अन्य बाबींमुळे देशभर उमटत असलेले पडसाद लक्षात घेता आता शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा पाठिंबा सरकारला महत्त्वाचा वाटू लागला आहे. ताजे 208 मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या असणारे पत्र हे केंद्राच्या त्याच उपाययोजनांचा भाग असल्याचे बोलले जाते. 

कॉंग्रेसचा ठपका कुलगुरूंवर 
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ताज्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी कॉंग्रेसकडून स्थापन करण्यात आलेल्या तथ्य संकलन समितीने या लाथाळ्यांसाठी कुलगुरू जगदीशकुमार यांना जबाबदार ठरवत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. कुलगुरूंची तातडीने हकालपट्टी करून त्यांची गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी केली जावी, असे यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. विद्यापीठामध्ये पाच जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारास सरकारची चिथावणी असल्याचा ठपकाही या अहवालात ठेवण्यात आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com