हत्त्याकांडामुळे अस्वस्थ झालेल्या तहसिलदाराचे एक पाऊल 'राईनपाडा' टाळण्यासाठी!  - tahsildra vishal naikwade story | Politics Marathi News - Sarkarnama

हत्त्याकांडामुळे अस्वस्थ झालेल्या तहसिलदाराचे एक पाऊल 'राईनपाडा' टाळण्यासाठी! 

संपत मोरे 
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

त्यादिवशी जामखेडचे तहसिलदार विशाल नाईकवाडेंच्या डोळ्याला डोळा लागला नाही. 

"ज्यादिवशी राईनपाडामध्ये घडलेली अमानुष घटना समजली. त्यादिवशी रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. खूप अस्वस्थ झालो होतो. अशी घटना कोठेही घडायला नको यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटायला लागलं. मग सकाळी एक निर्णय घेतला. मी ज्या तालुक्‍यात काम करतोय त्या तालुक्‍यात असे लोककलाकार आहेत. त्या सगळ्यांना ओळखपत्रं द्यायची. म्हणजे त्यांना कोणीही विचारलं तर ते ओळखपत्र दाखवतील. आमच्या पोलीस स्टेशनचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनाही हि कल्पना सांगितली आणि आम्ही जामखेड तालुक्‍यातील फिरत्या लोकांना ओळखपत्र दिली आहेत...'

नगर जिल्हातील जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे सांगत होते. 

प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपवून नाईकवाडे पहिल्यांदाच तहसीलदार म्हणून जामखेडला रुजू झाल्यावर या ओळखपत्र अभियानाने ते चर्चत आले आहेत. त्यांचं मूळ गाव सोलापूर जिल्हातील माढा तालुक्‍यातील उंदरगाव आणि राईनपाडा हत्त्याकांडात मारलेले गेलेले भटके त्यांच्याच जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे. 

यासंबंधाने नाईकवाडे म्हणाले "ज्या परिसरात माझं बालपण गेलं त्या परिसरात असे पोटासाठी वेगवेगळी कला सादर करणारे कलाकार आहेत. त्यांना लहानपणासून बघतोय. त्यांच्याबद्दल नेहमीच आपुलकी, कुतुहूल वाटत आलं आहे. राईनपाडाची घटना ऐकल्यावर मी हादरून गेलो. गैरसमजातून या माणसांना आपला जीव गमवावा लागला. माझी ज्या तालुक्‍यात नियुक्ती आहे त्या तालुक्‍यात वेगवेगळ्या समाजातील कलाकार आहेत. हा तालुका बीड सोलापूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. या तालुक्‍यातील कलाकार वेगवेगळी वेशभूषा करून आसपासच्या जिल्ह्यात भ्रमंती करतात. मला या लोकांची काळजी वाटू लागली. मग मी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार,आणि भटके विमुक्त समाजाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेले नेते अरुण जाधव यांना ही कल्पना सांगितली. त्यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला. त्यानंतर लोकांना ओळखपत्र दिली. जेणेकरून त्यांना आपली ओळख ठामपणे सांगता येईल" 

नाइकवाडे म्हणाले "पारधी समाजाच्या लोकांच्या मनात पोलिसांच्याबद्दल भीती असते. पोलीस गाडी बघितली कि त्यांना पळून जावं असं वाटतं. काहीही चूक नसताना हे लोक पोलिसांना घाबरतात. मग आम्ही पारधी समाजाचा एक मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांचा पोलिसांशी संवाद घडवून आणला. या संवादामुळे लोकांच्या मनातील भीती कमी झाली. पोलीस हे मित्र आहेत या संदेश त्यांच्या मनात निर्माण व्हावा हाच आमचा हेतू होता. " 

एका अमानुष घटनेने हादरून गेल्यानंतर आपण ज्या प्रशासनाचा भाग आहोत तिथून अशा घटना घडू नयेत म्हणून काय करता येईल, ते नाईकवाडे यांनी केलं आहे. या कामातून त्यांनी एक विधायक उपक्रम समोर आणला आहे. प्रशासकीय व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही खूपच दिशा देणारी गोष्ट आहे. जी दिसताना छोटी वाटेल पण असताना डोंगराएवढी मोठी आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख