स्वाभिमानीची विधानसभेसाठी 49 जागांची तयारी 

शेतकरी व तरूणांचे प्रश्‍न घेऊन यावेळेस राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. युती आणि आघाडीचा अनुभव गाठीशी असल्याने यावेळेस स्वतंत्र लढण्याचा आग्रह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी करत आहेत. तरीही स्वाभिमानीने 49 जागा लढण्याची तयारी केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे.
स्वाभिमानीची विधानसभेसाठी 49 जागांची तयारी 

सातारा : शेतकरी व तरूणांचे प्रश्‍न घेऊन यावेळेस राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. युती आणि आघाडीचा अनुभव गाठीशी असल्याने यावेळेस स्वतंत्र लढण्याचा आग्रह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी करत आहेत. तरीही स्वाभिमानीने 49 जागा लढण्याची तयारी केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आतापर्यंत आघाडी आणि युतीचा अनुभव घेतलेला आहे. मागील निवडणुकीत स्वाभिमानी संघटना भाजपसोबत राहिली. मात्र, त्यांना अपेक्षित शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटले नाहीत. तर सदाभाऊ खोत सत्तेत सहभागी झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत त्यांना भाजपसोबत राहूनच काम करावे लागले. परिणामी राजू शेट्टींनी सत्तेतून बाजूला होत, सत्ताधाऱ्यांविरोधात भुमिका घेतली. संघटनेतील नेत्यांत सुरू झालेल्या कलगीतूऱ्यामुळे स्वाभिमानीची ऊस दर आंदोलनाची ताकद विस्कळीत झाली. 

काही ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत सहभागी झाले. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस दराचे आंदोलन फारसे जोर धरू शकले नाही. तरीही पश्‍चिम महाराष्ट्रात स्वाभिमानीची ताकद आजही कायम आहे. त्यामुळे यावेळेस स्वाभिमानीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी युती आणि आघाडीऐवजी स्वतंत्र लढण्याची भुमिका घेतली आहे. अद्याप याबाबत राजू शेट्टींनी आपली भूमिका जाहिर केलेली नसली तरी विधानसभेसाठी त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठीच त्यांनी मध्यंतरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. 

आगामी काळात त्यांच्या या मोहिमेला किती यश येणार यावर संघटनेची आगामी वाटचाल अवलंबून आहे. तरीही स्वतंत्र लढताना विधानसभेच्या 49 जागा लढण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्ष करत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील चार जागांचा समावेश असून कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, फलटण आणि माण-खटाव मतदारसंघाचा समावेश आहे. 

मागील विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, कोरेगावातून संजय भगत, स्वाभिमानी पक्षातून फलटणमधून पोपटराव काकडे यांनी निवडणुक लढविली होती. आता मनोज घोरपडे भाजपमध्ये असून ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. तर संजय भगत सदाभाऊंसमवेत गेले. सध्या ते रयत क्रांती संघटनेत राज्य कोअर कमिटी सदस्य आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे संचालक आहेत. फलटणमधून स्वाभिमानीला नेहमीप्रमाणे यावेळेसही उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. तर माण-खटावमधून इच्छुकांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. बदललेल्या परिस्थितीत आता कऱ्हाड उत्तरमधून विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय नलवडे हे इच्छुक आहेत. त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस दर व इतर आंदोलनाच्या माध्यमातून चांगली ताकद निर्माण केलेली आहे. 

आता कोरेगाव, फलटण व माण-खटावमध्ये स्वाभिमानीला कोण उमेदवार भेटणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने मागणी केलेल्या विधानसभा मतदारसंघांतच स्वाभिमानीनेही उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कोण उमेदवार असतील, यावर आगामी निवडणुकीचे चित्र अवलंबून असेल. 

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी स्वबळासाठी आग्रह करत आहेत. मात्र, राजू शेट्टींनी सर्व विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामध्ये त्यांना किती यश येतय यावर सर्व गणिते अवलंबून आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विधानसभेसाठी 49 जागा लढण्याची तयारी केली आहे. आता आगामी काळात युती, आघाडी कि तिसरी आघाडी सोबत जायचे याबाबत राजू शेट्टींचा काय निर्णय होईल, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. 
- रविकांत तूपकर (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष) 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com