स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आता `मंत्र्यांचे कपडे फाडो' आंदोलन 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आता `मंत्र्यांचे कपडे फाडो' आंदोलन 

नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर गंभीर नसलेल्या फडणवीस सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता "मंत्र्यांचे कपडे फाडो' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी खासदार शेट्टी नागपुरात आले होते. 

यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, की राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाचे काहीही गांभीर्य असल्याचे दिसत नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची योजना जून 2017 मध्ये जाहीर केली होती. आता घोषणेला दीड वर्ष झाले आहे परंतु कर्जमाफीचा फायदा झालेला एकही शेतकरी मला भेटला नाही. कर्जमाफी न झाल्याने पुढील कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही. तूर खरेदी व कांद्याच्या प्रश्‍नावर राज्य सरकारने कोणतेही धोरण न ठेवल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कोणताही दिलासा राज्य सरकारने अद्यापपर्यंत दिलेला नाही. आता शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवायला सुरूवात केली आहे. तरीही सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता "मंत्र्यांचे कपडे फाडो' आंदोलन छेडण्याचे निर्देश स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. 

भाजपच्या सरकारांना राम मंदिर व हनुमानाच्या जातीची चिंता आहे परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चिंता नाही, असे सांगून खासदार शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या धोरणावर टीका केली. 

राज्यातही महागठबंधन होणार 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महागठबंधन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी व शेतमालांना दीडपट भाव या मागण्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाहीरनाम्यात समावेश कराव्या, यासाठी प्रयत्न सुरू आहे. राज्य समित्यांनी या दोन्ही मागण्यांना पाठिंबा दिला आहे. आता केंद्रीय समितीसोबत चर्चा सुरू आहे. याबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. 

येत्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेसह कोल्हापूर, सांगली, माढा, धुळे, बुलडाणा व वर्धा या मतदारसंघाची मागणी केली आहे. यात काही तरी तडजोड होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तडजोड न झाल्यास आम्ही लढायला मोकळे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com