मुख्यमंत्री साहेब सरकार चालवताय की सर्कस : रविकांत तुपकर

मुख्यमंत्री साहेब सरकार चालवताय की सर्कस : रविकांत तुपकर

संग्रामपुर तालुक्याच्या चार दिवसांचा झंझावती दाैरा करून चार दिवसात स्वाभिमानीच्या 74 शाखांचे उद्घाटन रविकांत तुपकर यांनी केले. यावेळी एकलारा येथे झालेल्या जाहिर सभेत तुपकर यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर टिकेची झाेड उठवली.

संग्रामपुर : ''छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्यांची घाेर निराशा केली अाहे. संपूर्ण कर्जमुक्ती, बोंडअळीचे अनुदान, सोयाबीनचे पडलेले भाव, तर गारपीटीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान. यातील एकाही योजनेचा एक पैसाही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. आता तर शेतकरी सरकारच्या नावाने चिठ्ठ्या लिहुन मंत्रालयासमोर आत्महत्या करीत आहे. त्यावर उपाय म्हणून सरकारने आता मंत्रालयात जाळी बसविली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकार चालवत अाहेत की सर्कस," असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते तथा वस्राेद्याेग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भाजप सरकारला केला अाहे. 

मंत्रालयाला जाळी बसवून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, त्यांचे दुखः दुर करण्यासाठी ठाेस उपाययाेजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर अांदाेलन छेडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. संग्रामपुर तालुक्याच्या चार दिवसांचा झंझावती दाैरा करून चार दिवसात स्वाभिमानीच्या 74 शाखांचे उद्घाटन रविकांत तुपकर यांनी केले. यावेळी एकलारा येथे झालेल्या जाहिर सभेत तुपकर यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारवर टिकेची झाेड उठवली. 

यावेळी बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले, "भाजप सरकारला सत्तेवर येवून चार वर्ष उलटली. मात्र, शेतकऱ्यांना दिलेले शब्द ते पाळु शकले नाहीत. बोंडअळीच्या अनुदानाचा प्रश्न असेल, संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा असेल, सोयाबीनचा भावाचा प्रश्न असेल आतापर्यंत एकाही आश्वासनाची पुर्तता सरकारने केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी संपुर्ण राज्यात गारपीट झाली. या आस्मानी संकटाने गहु, हरभरा, कांदा, द्राक्ष पिकांचे आतोनात नुकसान झाले. या नुकसानाची तातडीने भरपाई करुन द्यावी अशी आमची मागणी आहे. मात्र, सरकारने विमा कंपण्यांची बैठक बोलावण्यापलिकडे अद्याप काहीही केले नाही," सरकारने गारपीटीच्या नुकसानीसाठी विमा कंपण्यांकडे बोट दाखवू नये, कारण विमा भरतांना तारखेची डेडलाईन देण्यात आली होती. त्यातही अनेकवेळा सर्व्हर बंद राहत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यासाठी हे सरकार पळवाट काढत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी यावेळी केला. 

''छत्रपती शिवरायांच्या काळात शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केल्या नाही. कारण शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराजांचे आशिर्वाद होते. सरकार हे मायबाप असते. अस्मानी संकटात सरकारने शेतकऱ्यांना आधार दिला पाहीजे. जर भाजप सरकार अशा संकटाच्यावेळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडुन विमा कंपन्यांकडे बोट दाखवत असेल,  तर त्यांना छत्रपती शिवरायांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही," अशीही टीका त्यांनी केली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात नुकसान भरपाई न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभरात तीव्र आंदोलन उभारेल असा इशाराही तुपकर यांनी दिला. 

दरम्यान संग्रामपुर तालुक्यातील दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात एकलारा, बोडखा, टाकळीश्वर, वरवंटबकाल, पिंप्री कातरगांव, मनारडी, जस्तगांव, उकडगांव, कळमखेड, पातुर्डा, देऊळगांव, नेतनापुर, टकळीपंच, आवार, कोंद्री, उकळी, भोन या गावांत स्वाभिमानीच्या शाखांचे उद्घाटन रविकांत तुपकर यांचे हस्ते झाले. चार दिवसात तब्बल 74 गावांमध्ये स्वाभिमानीच्या शाखांचे उद्घाटन झाले. आवार येथे रविकांत तुपकर यांची घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमात प्रशांत डिक्कर, रोशन देशमुख, उज्वल पाटील, ज्ञानेश्वर हागे, मोहन पाटील, विलास तराळे, योगेश घायल, संतोष दाने, शे. अस्लम, संतोष तायडे यांची उपस्थिती होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com