swabhimani sanghatna demands minister post | Sarkarnama

राजू शेट्टींनाच कृषिमंत्री करा!  

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना शेट्टी यांनी वाचा फोडली.

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी दोन्ही काँग्रेसच्या आघाडीला साथ दिली. राज्यात दोन्ही काँग्रेस व शिवसेनेची महाविकास आघाडी सत्तेवर आल्याने राज्यातील कॅबिनेट कृषी मंत्रिपद त्यांनाच द्यावे, असा ठराव सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला. 

जिल्हाध्यक्ष महमूद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष वसंत गायकवाड, जिल्हा संघटक विजय रणदिवे, सचिव उमाशंकर पाटील, बिळ्यानी सुंटे, अक्कलकोट अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू पाटील, चांद यादगिरी, शिवाप्पा रामशेट्टी, श्रीशैल गुडेवाडी, सुरेश बिराजदार, बळीराम व्यवहारे, उत्तर तालुकाध्यक्ष पोपट साठे, मोहोळ तालुकाध्यक्ष आबासाहेब पवार आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांचे हित जोपासले जात नसल्याने माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्वांत प्रथम सत्तेतून बाहेर पडली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना शेट्टी यांनी वाचा फोडली.  शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर शेट्टी यांनी गेल्या २५ वर्षांपासून प्रचंड आंदोलने, मोर्चे काढून न्याय मिळवून देण्याचे काम केले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यातील महाविकास आघाडीत कृषी मंत्रालय राजू शेट्टी यांना देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचे पत्र व बैठकीचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फॅक्‍सद्वारे पाठविण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख