swabhimani activist questions farmer | Sarkarnama

खरंच शेतकऱ्यांना चळवळीची गरज वाटत नाही का? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

यावर संतापलेल्या मादनाईक यांनी, तुम्ही फक्‍त जिरवायचेच बघा. निवडणुकीत आपलीही जिरली आहे, त्याचंही जरा बघा, असे सांगताच सभागृहात शांतता पसरली.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना, ही शेतकऱ्यांच्या हक्‍कासाठी लढणारी चळवळ आहे, आपण संघटना म्हणून जन्माला आलो आहोत. राजकारण आपला धंदा नाही, त्यामुळे हुजरेगिरी बंद करा, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर ऊस परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आक्रमक व्हा', असा सल्ला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना दिला. 

उस परिषदेच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत राजकीय भूमिका, केलेली मदत व झालेला विरोध यावरुन नेत्यांनाही खडे बोल सुनावले. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, सावकार मादनाईक, सागर शंभूशेटे, रमेश भोजक, सुरेश कांबळे यांच्यासह प्रत्येक तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला मदत केली. प्रामाणिक प्रचार केला. मात्र आघाडीच्या नेत्यांनी शिरोळ येथे तटस्थ आणि सोयीची भूमिका घेतली. परिणामी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांना पराभूत व्हावे लागले. जर दगाफटका होणार याची कल्पना होती, तर आघाडी कशासाठी केली? आघाडी करुन काय मिळाले?, असा संतप्त सवाल करत हुजरेगिरी बंद करुन संघटना म्हणून काम करुया, असे आवाहनही यावेळी कार्यकर्त्यांनी केले.

संघटनेचा वापर जिल्ह्यातील नेते सोयीने करत आहेत. त्यामुळे व्यासपीठ संघटनेचे व मांडीला मांडी इतरांशी हा उद्योग आता बंद झाला पाहिजे, असे सांगत व्यासपीठावर येथून पुढे संघटनेच्याच लोकांना स्थान देण्याची मागणी केली. विधानसभेला ज्यांना मदत केली आहे, ती मंडळीच साखर कारखाने सुरु करत आहेत. दराची घोषणा केल्याशिवाय कारखाने सुरु होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, संबंधित कारखानदारांच्या दारात आंदोलन करण्याची मागणी केली.

बैठकीत कार्यकर्ते आक्रमक होत होते. यावेळी बोलताना एका कार्यकर्त्याने जिल्ह्याच्या राजकारणाचा आढावा घेतला. सावकार मादनाईकांचा पराभव वगळता आपण जिल्ह्यातील सर्वांची जिरवली असल्याचे अभिमानाने सांगितले. यावर संतापलेल्या मादनाईक यांनी, तुम्ही फक्‍त जिरवायचेच बघा. निवडणुकीत आपलीही जिरली आहे, त्याचंही जरा बघा, असे सांगताच सभागृहात शांतता पसरली.

दोन दशके राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवले आहे. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तसेच विधानसभा निवडणुकीत मादनाईक यांचाही पराभव झाला. शेतकऱ्यांच्या, दूध उत्पादकांच्या हितासाठी रात्रं-दिवस आंदोलन करुन, रक्‍तरंजित संघर्ष करुनही पराभव का? खरंच शेतकऱ्यांना आपली किंवा चळवळीची गरज वाटत नाही का?, याचाही शोध घेण्याची मागणी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी केली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख