अर्ज भरण्याचे शेवटचे 24 तास : पळवापळवीच्या भीतीने भंडारा-गोंदियात उमेदवारांचा सस्पेन्स

अर्ज भरण्याचे शेवटचे 24 तास : पळवापळवीच्या भीतीने भंडारा-गोंदियात उमेदवारांचा सस्पेन्स

भंडारा : लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा-गोंदियात उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता 24 तास बाकी असताना भाजप आणि राष्ट्रवादीकडून अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. दोन्ही पक्षांना एकमेकांचे उमेदवार पळविण्याची भीती असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे.

या मतदारसंघात प्रफुल्ल पटेल, पंतप्रधान मोदींवर सरळ टीका करून भाजप पक्षाबाहेर पडलेले नाना पटोले यांच्यासारखे मोठे नेते असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. येथे जातीचे समीकरण अधिक महत्वाची भूमिका बजावते. यात कुणबी आणि पोवार हा समाज मोठा व समृद्ध समाज असुन उमेदवार ठरवितांना या समाजाचा विचार करावा लागतो. या मतदारसंघात दोन्ही पक्ष एकमेकांचे उमेदवार जाहीर करण्याचे वाट पाहत आहेत. याला कारणही तसेच आहे.

येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा प्रफुल्ल पटेल असतानाही त्यांनी आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही. राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार मधुकर कुकडे (कुणबी) हे यावेळी परत खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यास इच्छुक आहेत. ते तिकीट मिळविण्यासाठी भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. सहा महिन्यांपूर्वी गडकरी वाड्यात झालेली कुकडे-गडकरी भेट बरेच काही बोलून जात आहे.

राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, मधुकर कुकडे, विजय शिवनकर, सुनील फुंडे, नाना पंचबुधे यांचे नावे समोर येत आहे.
दुसरीकडे भाजपलाही आपला उमेदवार पळविण्याची भीती वाटत आहे. तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले राजेंद्र पटले (पोवार) हे खासदरकी लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शिवाय भाजपने उमेदवारी नाकारली तर राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे ते उघडपणे बोलून भाजपवर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. जरी दोन्ही पक्षांनी तिकीट न दिल्यास अपक्ष उभे राहून निवडणूक लढविणारच असल्याची त्यांची तयारी आहे.

याशिवाय भाजपकडून परिणय फुके, सुनील मेंढे, खुशाल बोपचे, हेमंत पटले यांचे नाव पुढे आहे. या साऱ्या परिस्थितीत दोन्ही पक्ष अगोदर उमेदवारी जाहीर करण्याचा धोका पत्करत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com