मुलीला सहानुभूती मिळविण्याचा सुशीलकुमारांचा प्रयत्न

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कॉंग्रेसला मदत करणार की कॉंग्रेसने केलेल्या आहेराची परतफेड करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुलीला सहानुभूती मिळविण्याचा सुशीलकुमारांचा प्रयत्न

सोलापूर: पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीचे भारत भालके यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या शिवाजीराव काळुंगे यांची उमेदवारी कायम राहिली आहे. सोलापूर शहर मध्यमध्ये कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या जुबेर बागवान यांनी दाखल केलेला अर्ज मात्र मागे घेण्यात आला आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीतून शेवटच्या क्षणी आघाडी तोडून कॉंग्रेसने राष्ट्रवादीला तोंडावर पाडले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा असाच अनुभव आल्याने शहर मध्यमधील राष्ट्रवादी अस्वस्थ झाली आहे. दुरावलेली मने जुळविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दोन्ही कॉंग्रेसच्या विलीनीकरणाचा मुद्दा समोर आणल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीनंतर देशातील आणि राज्यातील कॉंग्रेस कोमात गेली आहे. राष्ट्रवादीने पराभवाचा धाडसाने सामना करत शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तरुणाईला लाजवेल असा उत्साह व रणनीती आखत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व्यक्तिशः लक्ष घालून तरुणाईची ताकद संघटित केली आहे. त्या तुलनेत कॉंग्रेस मात्र अद्यापही संगमनेर, लातूर, सोलापूर शहर मध्यच्या बाहेर निघण्यास तयार नाही. पराभवावर जिद्दीची फुंकर घालून राष्ट्रवादीत आता आक्रमकता आणि उत्साह संचारलेला आहे. राष्ट्रवादीबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून होताना दिसत आहे. 

युतीचा निर्णय झाल्यानंतर राज्यातील शिवसेना व भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. शहापूरचे दौलत दरोडा, नाशिकचे बाळासाहेब सानप यांचा समावेश आहे. नेतृत्वहीन झालेल्या कॉंग्रेसमध्ये जाण्यास फारसे कोणी उत्सुक नसल्याचे सध्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र घालून गेलेल्या नेत्यांना या निवडणुकीत विधानसभा गाठू न देण्याचा चंगच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बांधल्याने कार्यकर्त्यांमध्ये कॉंग्रेसच्या तुलनेत उत्साह दिसत आहे. इडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाई नंतर "वारं फिरलयं' हे अधिक प्रकर्षाने जाणवू लागले आहे. 

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसची आघाडी शेवटच्या क्षणी तोडण्यात आली. ही आघाडी तुटण्यास कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या जबाबदार असल्याची कबुली राष्ट्रवादीचे पदाधिकारी खासगीत देतात. 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक शहर मध्यमधून विजयी झाले होते. 2017 मध्ये एकही नगरसेवक विजयी झाला नाही. आघाडी होईल या आशेपोटी राष्ट्रवादी गाफील राहिल्याचा मोठा फटका सहन करावा लागला. शहर मध्यमधून राष्ट्रवादीच्या बागवान यांचा अर्ज मागे घेतला परंतु पंढरपूरमधून कॉंग्रेसच्या काळुंगे यांची उमेदवारी कायम राहिली. दोन लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर यंदाची विधानसभा निवडणूक सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्या अस्तित्वाची आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कॉंग्रेसला मदत करणार की कॉंग्रेसने केलेल्या आहेराची परतफेड करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com