स्वामी-आंबेडकरांच्या कात्रीत शिंदे 

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींच्या रूपाने धार्मिक-आध्यात्मिक गुरूंचा, तर ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने वंचितांच्या एकत्रित ताकदीचा सामना सोलापूर लोकसभा मतदारसंघात करावा लागणार आहे.
स्वामी-आंबेडकरांच्या कात्रीत शिंदे 

सोलापुरातील कॉंग्रेसचे उमेदवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींच्या रूपाने धार्मिक-आध्यात्मिक गुरूंचा, तर ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या रूपाने वंचितांच्या एकत्रित ताकदीचा सामना शिंदे यांना करावा लागणार आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत भाजपने डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींची उमेदवारी आज निश्‍चित केल्याने जवळजवळ स्पष्ट झाली आहे. कॉंग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपतर्फे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यात ही अटीतटीची तिरंगी लढत असणार आहे. 

सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दुमत नाही. तरीसुद्धा, गेल्या निवडणुकीत फटका बसल्याने शिंदे यांनी अतिशय सावध पावले टाकायला सुरवात केली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी शिंदेंना पाठिंबा देण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्या बदल्यात त्यांनी विधानसभेसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची मागणी केली आहे. ही मागणी सध्या कॉंग्रेस मान्य करूच शकत नाही. या जागेवरूनच सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या, आमदार प्रणिती शिंदे दोनदा निवडून आल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची मंडळी माकपच्या वरिष्ठांना संपर्क साधून आडम यांची समजूत काढतील असे दिसते. एवढा एक अडथळा सोडला तर सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे सध्या तरी कोणतीही अडचण दिसत नाहीत. 

कोण आहेत डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी ? 
खासदार शरद बनसोडे किंवा अमर साबळे किंवा अन्य राजकीय व्यक्तीला वगळून भाजपने गौडगावचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली. सोलापूरच्या बाहेर फारसे परिचित नसलेल्या डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींबाबत भाजपची उमेदवारी मिळाल्याने खूपच चर्चा झाली आहे. कोण आहेत जयसिद्धेश्वर स्वामी, याबाबत लोक माहिती करून घेऊ लागले. डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी लिंगायत समाजातील आध्यात्मिक गुरू आहेत. काशीतील विश्वविद्यालयातून त्यांनी डॉक्‍टरेट केली आहे. स्वामींचा लिंगायत समाजावर प्रभाव आहे. या समाजाची सोलापूरमधील मतांची संख्या लक्षात घेतली, तर स्वामींना भाजपने का तिकीट दिले, याचे उत्तर मिळते. गेल्या महिन्यातच स्वामींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा केली होती. मात्र, स्वामींनी याबाबत एक ब्र शब्दही काढला नव्हता. अक्कलकोटमधील भाजपच्या एका मेळाव्यात काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रथम राजकारणाबाबत मौन सोडले आणि बोलले. भाजपकडून स्वामींचे तिकीट पक्के झाल्याची, ही खूण होती. मात्र, आता स्वामींना लिंगायत समाजातील काही मंडळींचा विरोधही सुरू झालेला आहे. स्वामींना लढण्याची मनोमन तयारी केल्यामुळे या विरोधाला ते जुमानणार नाहीत, हे स्पष्ट आहे. 

आंबेडकर सोलापुरात उभे भरणार ? 
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून उभा राहण्याची तयारी केली आहे. आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर हे सध्या सोलापुरातच तळ ठोकून आहेत. वंचित बहुजन आघाडीला सोलापुरात मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून अर्ज भरणारच, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. अलीकडेच आघाडीच्या झालेल्या सोलापुरातील सभेला लाखोंची गर्दी झाली होती. त्यामुळे आंबेडकर निश्‍चिंत आहेत. अकोल्यातूनही त्यांनी लढावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते सोलापुरातून, अकोल्यातून किंवा दोन्ही मतदारसंघातून लढणार हे पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे. 

लढत कशी होईल?
ऍड. प्रकाश आंबेडकर उभा राहिल्यास त्यांचे मोठे आव्हान सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे असणार आहे. मतांमध्ये होणारी फूट दोघांनाही महागात पडणार आहे. सोलापूर शहरामध्ये लिंगायत, पद्मशाली आणि मुस्लिम मतांची संख्या लक्षणीय आहे. या मतांच्या बेरीज-वजाबाकीवरच जय-पराजय ठरणार आहे. सोलापूर मतदारसंघात सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ आणि पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे सोलापूर शहराच्या आसपासच्या विधानसभा मतदारसंघाबरोबर मोहोळ आणि पंढरपूरवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. ही लढाई आता सुरू झालेलीच आहे. पुढील आठवड्यापासून त्याला धार येईल, एवढेच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com