sushilkumar shinde | Sarkarnama

आता काय मिळवायचं? म्हणून भविष्य बघायचं ? : सुशीलकुमार शिंदे 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सुशीलकुमार शिंदे आणि ज्योतिषी यांचा आजवर निकटचा संबंध राहिला आहे. त्यांच्यासाठी आणखी मोठ्या पदांची भाकिते वर्तविण्यात आली आहेत. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत वास्तवाला त्यांनी महत्त्व दिल्याचे दिसत आहे. 

पुणे : "माझ्या राजकीय जीवनातही अनेक भविष्य सांगणारे आले. मला खूप काही मिळाले. आता काही मिळवायचे नाही, त्यामुळे भविष्य बघायचे नाही', अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी निवृत्तीचे संकेत दिले. 

बालगंधर्व रंगमंदिरात शाहू मोडक स्मृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. गायक सुरेश वाडकर, क्रिकेटपटू चंदू बोर्डे, प्रतिभाताई मोडक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात दत्तात्रेय अत्रे या ज्योतिषाला पुरस्काराने गौरविण्यात आले.

अत्रे म्हणाले, राजकीय व्यक्‍तींसाठी "रवी' चांगला असणे
महत्त्वाचे आहे. सर्व काही भविष्यावर अवलंबून नाही तर कर्तृत्वही असावे लागते. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना आपण भविष्य सांगितल्याचे अत्रे म्हणाले.  चंदू बोर्डे म्हणाले,"क्रिकेटमध्ये अंधश्रद्धाळू लोक असतात. अनेक सामन्यांत खेळाडूंनी ज्योतिष्याने सांगितल्याप्रमाणे वर्तन केल्याचे पाहिले आहे. श्रद्धा असावी, पण
अंधश्रद्धा नसावी' 

सुशीलकुमार शिंदे यांनी चंदू बोर्डे यांच्या मताशी सहमती दर्शवत भविष्य हे दिशा दाखवते, असे सांगितले. राजकारण्यांच्याभोवती अनेक ज्योतिषी असतात. माझे ज्योतिष अनेकांनी सांगितले. मला काही कमी पडले नाही आणि आता काही मिळवायचे नाही. त्यामुळे आता भविष्य भविष्य बघायचे नाही, असेही शिंदे म्हणाले. 

या कार्यक्रमात अंध क्रिकेटपटू अमोल करचे, गायिका जिया वाडकर, सोहम गोरणे, श्रीरंग महाजन यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख