. आणि सुषमाजींनी मराठी मुलाला न्याय दिला 

कॅलिफोर्नियात शिकणारा हा तरुण सुट्टी घेऊन आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आला होता. परत अमेरिकेला गेला तेव्हा एअरपोर्टवर त्याला सुरक्षा यंत्रणांनी हातकड्या घालत अटक केली.
khaire-sushmaji-pritam.
khaire-sushmaji-pritam.

औरंगाबादः परराष्ट्रमंत्री असतांना नगरच्या एका मराठी मुलाची अडचण घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. कॅलिफोर्नियात शिकणारा हा तरुण सुट्टी घेऊन आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आला होता. परत अमेरिकेला गेला तेव्हा एअरपोर्टवर त्याला सुरक्षा यंत्रणांनी हातकड्या घालत अटक केली. कारण काय तर त्याची जन्मतारीख एका मोस्टवॉटेड अतिरेक्‍याशी मिळती जुळती होती. 

तो टाहो फोडून सांगत होता, मी विद्यार्थी आहे, माझा त्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही, पण तेथील सुरक्षा यंत्रणा ऐकायला तयार नव्हती. त्या तरुणाने माझ्याशी संपर्क साधला. मी सुषमा स्वराजांकडे गेलो, त्यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आणि तात्काळ अमेरिकेतील दूतावासात संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या मराठी मुलाची सुटका झाली. आज तो शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिथे मोठ्या पदावर कंपनीत कार्यरत असल्याची आठवण शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 

सुषमा स्वराज यांचीशी माझा संपर्क 13 व्या लोकसभेपासून म्हणजेच वीस वर्षांपासून होता. परराष्ट्रमंत्री असतांना सर्वपक्षीय खासदारांच्या युरोपीय दौऱ्यात त्यांच्यासोबत जाण्याचा मला योग आला. ज्या देशात आमचे शिष्टमंडळ जायचे तिथे त्या तेथील पंतप्रधान, सचिव आदी मोठ्या अधिकाऱ्यांची आमची ओळख करुन द्यायच्या. शिवसेनेचा खासदार असल्यामुळे माझी ओळख करून देतांना त्या हे बाळासाहेब ठाकरेंचे शिष्य असे आर्वजून सांगायच्या. संसदेत किंवा इतर कुठेही जेव्हा केव्हा माझी त्यांची भेट व्हायची त्या मला 'जय महाराष्ट्र' म्हणायच्याच. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संपुुर्ण शिवसेनेसाठी त्या बहिणीप्रमाणे होत्या. मतदारसंघातील प्रश्‍नासंदर्भात अनेकदा मी त्यांच्या दिल्लीतील कार्यालयात निवदेन घेऊन जायचो. प्रलंबित मागण्यांवर चर्चा करायचो. एकदा मी त्यांना माझे व्यक्तिगत मत व्यक्त करण्याची परवानगी मागितली.

माझ्या मोठ्या बहिण म्हणून माझ्या या भावना आहेत, की तुम्ही एकदा देशाच्या पंतप्रधान होणार अशा शुभेच्छा मी त्यांना दिल्या. तेव्हा "अरे खैरेजी ये आप क्‍या बोल रहे हो, पार्टी मे बहोत सिनियर नेता है'' असे म्हणत त्यांनी नम्रपणे नकार दिला. तेव्हा आज नाही पण भविष्यात कधीतरी तुम्ही पंतप्रधान व्हाल असे मी त्यांना म्हणालो होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची देखील ती इच्छा होती आणि त्यांनी ती बोलून देखील दाखवली होती. 

माझ्यावर रागवल्या होत्या.. 

मतदारसंघातील लोकांना पासपोर्ट काढायसाठी मुंबईला जावे लागायचे. माझ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट कार्यालय सुरू करा अशी मागणी मी सुषमा स्वराज यांच्याकडे केली होती. त्यासाठी पत्रव्यवहार आणि भेट होईल तिथे मी पाठपुरावा करायचो. सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे त्या एकदा माझ्यावर रागवल्या देखील होत्या. "खैरे जी कितनी बार याद दिलाते हो, मुझे आपकी वजहसे सत्तर जगह पर पासपोर्ट कार्यालय शुरू करना पड रहा है' असे त्या म्हणाल्या. एकाद खासदार प्रीतम मुंडे देखील माझ्या सोबत होत्या. खैरेजी की वजहसे आपके वहा भी पासपोर्ट कार्यालय हो रहा है' असे त्यांनी तेव्हा सांगितले होते. 

केंद्रात आरोग्य मंत्री असतांना आपापल्या लोकसभा मतदारसंघात आरोग्य मेळावे घेण्यासाठी त्यांनी 8 लाखांचा निधी प्रत्येक खासदाराला दिला होता. त्याचा फायदा अनेक गोर-गरीब रुग्णांना झाला. सुषमा स्वराज माझ्यासाठी कुटुंबाच्या सदस्यासारख्या  होत्या. त्यांच्या जाण्याने केवळ भाजपचेच नाही तर आम्हा शिवसैनिकांचे आणि संपुर्ण देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. 

(शब्दांकन : जगदीश पानसरे )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com