अरविंद केजरीवाल यांच्याविरूध्द भाजपकडून सुषमा स्वराज यांच्या कन्या ?

अरविंद केजरीवाल यांच्याविरूध्द भाजपकडून सुषमा स्वराज यांच्या कन्या ?

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, असा लौकिक असलेल्या भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरविण्याच्या हालचाली भाजपमध्ये आहेत. बासुरी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरूध्द नवी दिल्लीतून लढावे अशी भाजप श्रेष्ठींची इच्छा असल्याचे समजते. येत्या शनिवारच्या आसपास (ता.17) भाजपची उमेदवार यादी जाहीर हेण्याची शक्‍यता आहे. मात्र स्वतः बासुरी स्वराज यांची सक्रिय राजकारणात पडण्याची इच्छा आहे का, याची माहिती समोर आलेली नाही. 

दिल्लीच्या रणधुमाळीत सुषमा स्वराज व अरूण जेटली यांच्यासारख्या नेत्यांची उणीव भाजप नेतृत्वाला जाणवू लागली आहे. वर्तमान तिन्ही आमदारांची तिकीटे कायम ठेवतानाच उर्वरीत 67 जागांसाठी भाजप नेतृत्व दिल्लीत "फ्रेश' चेहऱ्यांच्या शोधात आहे. केजरीवाल यांच्यासमोर दिग्गज भाजप नेत्याला उतरवावे असा मतप्रवाह होता पण केंद्रात सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या भाजपला दिल्लीत केजरीवाल सरकारच्या समोर उभा राहील असा नेता सापडणे उंबराच्या फुलापेक्षाही दुर्मिळ असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजप नेतृत्वाने अगदी वेगळ्या चेहऱ्यांचा शोध सुरू केला तेव्हा केजरीवाल यांचेच एकेकाळचे सहकारी कपिल मिश्रा, बासुरी स्वराज, माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे खासदार पुत्र प्रवेश साहिबसिंह आदी नेत्यांबाबत विचार केला. मात्र नवी दिल्लीतील नोकरशहा व उच्च मध्यमवर्गीय मतदार लक्षात घेता बासुरी यांच्या नावाबाबत स्वतः मोदी आशावादी असल्याचे पक्षनेते सांगतात. विशेषतः या भागात सुषमा स्वराज यांच्याबाबत प्रचंड सहानुभूती व जिव्हाळा असलेले मतदार बहुसंख्येने आहेत. त्याचाही लाभ बासुरी यांना होऊ शकतो असे भाजप नेते मानतात. 

स्वराज यांच्या श्रध्दांजली सभेत बासुरी यांनी आभार प्रदर्शन केले होते. त्यांची बोलण्याची शैली, ऑक्‍सफर्डमध्ये यांनी वकिलीचे शिक्षण घेतले असले तरी हिंदीवरील पकड यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभावित झाल्याचे सांगण्यात येते. केजरीवाल सरकारच्या लोकप्रिय घोषणांसमोर दिल्ली भाजपचा पाड लागणार नाही हे लक्षात येताच पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीची सूत्रे स्वतःकडे घेतली. भाजप उमेदवारांची अंतिम यादी ठरल्यावर ते अध्यक्षपदाची सूत्रे जे पी नड्डा यांच्याकडे देतील. 
सुषमा स्वराज यांना जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधून दिल्लीत पाठविले गेले तेव्हा त्यांचीही दिल्लीतील पाटी तशी कोरीच होती. मात्र त्यांनी ज्या धडाडीने दिल्ली पिंजून काढली व येथील "हवा' आत्मसात केली त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्यांत तेव्हाचे राष्ट्रीय सरचिटणीस व वर्तमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही आहेत असे भाजप नेते सांगतात. साहजिकच स्वराज यांच्या वक्तृत्वाप्रमाणेच त्यांच्यातील धडाडी हा गुणही बासुरी यांच्यात मोदी यांना दिसला असावा व त्यातूनच त्यांच्या प्रस्तावित भाजप उमेदवारीची चर्चा सुरू झाली असावी असा पक्षनेत्यांचा होरा आहे. 
फाशीरूनही राजकारण 
निर्भया बलात्कार प्रकरणातील चौघा नराधमांना फाशीच्या शिक्षेची 22 जानेवारी ही तारीख पुन्हा टळल्याने सर्वसामान्य नागरिकांत नाराजी व संतापाचीही भावना आहे. हे नवे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून भाजपने आधीच याबाबत "आप'वर आरोप सुरू केले आहेत. भाजप प्रभारी प्रकाश जावडेकर यांनी आरोप केला की दिल्ली सरकारने या दोषींना दया याचिका दाखल करण्याची नोटीस देण्यास दोन-अडीच वर्षे विलंब केला. त्यामुळेच त्यांच्या फाशीला होणाऱ्या विलंबाला आप सरकारच दोषी आहे. मात्र "आप'ने भाजपचे आरोप फेटाळताना, भाजपनेच माफी मागावी अशी मागणी केली. दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्राची असते व राज्याला यात काहीही अधिकार नाहीत हेदेखील केंद्रीय मंत्री असलेल्या जावडेकर यांना माहिती नाही काय, असा सवाल आपने केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com