कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सूरमंजिरी लाटकर

कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सूरमंजिरी लाटकर

कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौरपदी कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना आघाडीच्या ऍड. सूरमंजिरी लाटकर यांची 43 विरुध्द 32 मतांनी निवड झाली. त्यांनी भाजप ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटके यांचा पराभव केला. उपमहापौरपदीही कॉग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे संजय मोहिते आणि भाजप ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांच्यात लढत झाली. या लढतीतही संजय मोहिते यांनी कमलाकर भोपळे यांचा 43 विरुध्द 32 मतांनी पराभव केला. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त डॉ.एम.एस.कलशेट्टी यांच्या उपस्थितीत झालेल्या महापालिकेच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात ही सभा झाली. निवडीनंतर लाटकर आणि मोहिते यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आणि प्रचंड घोषणाबाजी करत विजयी मिरवणूक काढली. महापौरपदासाठी सत्तारुढ कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि विरोधी भाजपा ताराराणी आघाडीत ही नेहमीच लढाई होत असते. यापुर्वीही ऍड.सूरमंजिरी लाटकर यांचे नाव दोनवेळा ऐनवेळी मागे पडले होते. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत लाटकर यांच्य महापौरपदाची उत्कंठा लाटकर त्यांचे कुटूंबिय आणि समर्थकांना लागून राहिली होती. लाटकर या विचारेमाळ या प्रभागातून पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत. त्यांच्या रुपाने एक उच्चशिक्षीत महिला महापालिकेच्या महपौरपदी विराजमान झाल्या आहेत. 

आज महापौर निवडीची सभा असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून महापालिकेत कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी साडेदहा वाजताच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आगमन महापालिकेत झाले. दोन्ही कॉग्रेसचे सर्व सदस्य आमदार सतेज पाटील यांच्या अंजिंक्‍यतारा येथील कार्यालयाजवळ थांबले होते. भाजपा ताराराणी आघाडीचे सदस्य लिशा हॉटेल चौकातील चैताली हॉटेलजवळ एकत्र जमले होते. दोन्ही कॉग्रेसचे सर्व सदस्य खासगी आराम बसमधून पावणेअकराच्या सुमारास महापालिकेत आले. त्यांच्या बसच्या समोर आमदार त्रुतूराज पाटील यांची गाडी होती. ते स्वतः गाडी चालवत आले. त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत जाधव, महापौरपदाच्या उमेदवार सूरमंजिरी लाटकर, शहर कॉग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष आर.के.पोवार,उपमहापौरपदाचे उमेदवार संजय मोहिते गाडीमध्ये होते. कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या तसेच आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घोषणा देत दोन्ही कॉग्रेसचे नगरसेवक महापालिका चौकातून सभागृहात आले. विरोधी भाजपा ताराराणी आघाडीचे नगरसेवकही पक्षाच्या तसेच माजी आमदार महाडिक,माजी खासदार धंनजय महाडिक यांच्या नावाचा जयघोष करत महापालिकेत आले. 

सकाळी अकरा वाजता सभेला सुरवात झाली.नगरसचिव यांनी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा सभेचे अध्यक्ष दौलत देसाई याच्याकडे दिले.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या अर्जाची छाननी केली. महापौरपदासाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ऍड. सूरमंजिरी लाटकर यांचा आणि भाजपा ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटके यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. त्यानंतर माघारीसाठी पंधरा मिनीटे वेळ देण्यात आला. पण एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. 

महापौरपदासाठी ऍड.सूरमंजिरी लाटकर यांना 43 मते तर विरोधी उमेदवार भाग्यश्री शेटके यांना 32 मते मिळाली. 81 सदस्यसंख्या असलेल्या या सभागृहात शिवसेनेचे नियाज खान,अभिजीत चव्हाण,राहूल चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे या तसेच ताराराणी आघाडीच्या तेजस्विनी इंगवले या गैरहजर राहिल्या. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शमा मुल्ल यांचेही नगरसेवकपद नुकतेच रद्द झाले आहे.त्यामुळे 81 पैकी 75 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. उपमहापौरपदासाठीही कॉग्रेसच्या संजय मोहिते यांना 43 तर विरोधी भाजपा ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांना 32 मते मिळाली. 

दोघांनी फेटे घातले नाहीत. 
दोन्ही कॉग्रेसचे सर्व नगरसेवक,नगरसेविका यांनी फेटे घालून सभागृहात प्रवेश केला. तसेच फेटे परिधान करुनच ते सभागृहात बसले होते. पण राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक मुरलीधर जाधव, तसेच स्वीकृत नगरसेवक प्रा.जयंत पाटील यांनी मात्र फेटे परिधान केले नव्हते. या दोघांचाही लाटकर यांना पूर्वीपासून विरोधच होत. यापैकी प्रा.पाटील हे स्वीकृत नगरसेवक असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण मुरलीधर जाधव यांनी फेटा परिधान केला नसला तरी मतदान मात्र आघाडीच्य उमेदवार लाटकर यांनाच केले. 

कॉग्रेसच्या आमदाराच्या पत्नी, भावाचे मतदान भाजपा ताराराणी आघाडीला 
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे नूतन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री आणि त्यांचे भाऊ संभाजी जाधव यांनी आज कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसऐवजी भाजपा ताराराणी आघाडीच्याच उमेदवारांना मतदान केले. याचीही चर्चा होते. ते काय करतात याबाबात उत्सुकता होती.मात्र ते 2010 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत भाजपाच्या तिकिटावरच निवडून आल्याने त्यांनी या आघाडीलाच मतदान केले आहे.याबाबत आमदार चंद्रकांत जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, ते ज्या पक्षातून निवडून आले आहेत.त्या पक्षासोबतच ते राहिले पाहिजेत म्हणून त्यांनी ते जेथून निवडून आले तेथेच मतदान केले आहे.असे सांगीतले. दरम्यान,आमदार चंद्रकांत जाधव हे मात्र दोन्ही कॉग्रेसच्या सदस्यांना घेउन येणाऱ्या बससोबतच महापालिकेत आले. आमदार त्रुतूराज पाटील यांच्या गाडीमध्ये ते बसले होते. 

गुलालाची उधळण 
निवडीनंतर या महापौर ऍड.सूरमंजिरी लाटकर आणि उपमहापौर संजय मोहिते यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी करत विजयी मिरवणुका काढल्या. या विजयी मिरवणुकीसाठीही मोठी गर्दी झाली होती. दोनवेळा महापौरपदाने ऍड.लाटकर यांना हुलकावणी दिली होती.यावेळी मात्र हे पद मिळाल्यामुळे त्यांच्या कुटूंबियानाही उत्कंठा होते. त्यांचे सर्व कुटूंबिय यावेळी उपस्थित होते. ऍड.लाटकर यांचे सासू,सासरे,जाउबाई, मुले तसेच ऍड.लाटकर यांचे आई,वडीलही यावेळी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com