sureshdada jain in watchadog role in jalgaon | Sarkarnama

आता आम्ही 'वॉचडॉग'च्या भूमिकेत : सुरेशदादा जैन 

राहुल रनाळकर 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

राज्यात भाजपाचेच सरकार असल्याने एखादे पॅकेज पदरात पाडून घेणे हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सहज शक्‍य आहे. त्याची गरजही आहे. पण पालिकेचे बंद झालेले उत्पन्नाचे स्त्रोत पुन्हा सुरु करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्याशिवाय जळगाव महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकत नाही. 
-सुरेशदादा जैन 

जळगाव : जळगाव महापालिकेत यापुढे आम्ही "वॉचडॉग'च्या भूमिकेत काम करु, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी मांडली. 

सुरेशदादांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात विविध मतेमतांतरे पुढील काळात निर्माण होणार आहेत. आत्तापर्यंत सत्ताधीशांच्या भूमिकेत असलेले सुरेशदादा आणि त्यांचे शिलेदार पुढच्या काळात "वॉचडॉग'ची भूमिका कशाप्रकारे निभावतात, हा जळगावकरांसाठी औत्सुक्‍याचा विषय आहे. 

जैन पुढे म्हणाले, की विकासाच्या प्रश्‍नांबाबत नवनियुक्त नगरसेवकांनी ठोस भूमिका घेतल्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल. पण जिथे विरोध करण्याची किंवा जळगावकरांच्या भविष्याचा प्रश्‍न असेल, तिथे आम्ही रोखठोक भूमिका घेऊ. भारतीय जनता पार्टीने जळगावच्या जनतेला विविध आश्‍वासने दिलेली आहेत, ती आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्यावर दबाव आणू. अमृत योजनेचा विषय जळगावसाठी महत्त्वाचा आहे, पण पहिल्या टप्प्यात या योजनेत वॉटर मीटर बसवण्याचे प्रस्तावित नाही. दुसऱ्या टप्प्यात मात्र वॉटर मीटर लावण्यासाठी आमचा आग्रह असेल. 
भूमिगत गटारींसाठी हवे धुळ्याप्रमाणे तंत्रज्ञान 

भूमिगत गटारी हा देखील पुढच्या किमान 50 वर्षांसाठी अत्यंत गरजेचा विषय आहे. या विषयाबाबत तर सत्तेत असतानाही आम्ही प्रशासनाशी भांडत होतो. भूमिगत गटारींबाबत धुळ्यात उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. जळगावबाबत मात्र कमी दर्जाच्या तंत्रज्ञानाला आम्ही अनेकदा पत्र पाठवून विरोध दर्शविला आहे. आता भाजपा इथेही आणि राज्यातही सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनी हा विषय अत्यंत तातडीने मार्गी लावायला हवा. नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे हा विषय प्रलंबित आहे. या संदर्भातील तांत्रिक प्रक्रिया आम्हाला हवी तशी आम्ही करुन घेण्यासाठी आग्रही राहू. भुयारी गटारातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन मोठा महसूल पालिकेला मिळणार आहे. हे तंत्रज्ञान धुळ्याला मिळतेय आणि जळगावला नाही, ही बाब आम्ही कोणत्याही स्थितीत सहन करणार नाही. त्यासाठी आम्ही सडेतोड भूमिका मांडत राहणार आहोत. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख