सुरेश जैन यांना तात्पुरता दिलासा

..
sureshdada_jain
sureshdada_jain

मुंबई :  जळगावमधील घरकुल योजनेतील गैरव्यवहारात दोषी ठरलेले माजी मंत्री सुरेश जैन (76) यांना बुधवारी (ता. 20) मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला. न्यायालयाने त्यांना वैद्यकीय कारणांसाठी तीन महिन्यांपर्यंत जामीन मंजूर केला आहे.


घरकुल योजनेत सुरेश जैन यांना धुळे सत्र न्यायालयाने या वर्षी ऑगस्टमध्ये दोषी ठरवले. या खटल्यात त्यांना सात वर्षे सक्तमजुरी आणि 100 कोटी रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात अपील याचिका केली आहे. प्रकृतिअस्वास्थ्य आणि अपील प्रलंबित असल्यामुळे शिक्षा स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सुरेश जैन यांनी प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळावा, असा अर्ज ऍड्‌. आबाद पोंडा आणि ऍड्‌. सुभाष जाधव यांच्यामार्फत उच्च न्यायालयात केला आहे. या अर्जावर बुधवारी न्या. रणजीत मोरे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.


उच्च न्यायालयाने पाच लाख रुपयांच्या वैयक्तिक हमीपत्रावर त्यांना जामीन मंजूर केला. तूर्तास हा जामीन तीन महिन्यांचा असेल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. अर्जावर पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे.


घरकुल योजनेतील दोषींमध्ये सुरेश जैन यांच्यासह माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, काही नगरसेवक व अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जळगावमध्ये गरिबांसाठी सुमारे पाच हजार घरे बांधण्याची सरकारी योजना होती. परंतु, नियमांचे उल्लंघन करून फक्त 1500 घरे बांधण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती.

उपचारासाठी  आवश्‍यकता 
खटल्याच्या निकालाआधी चार वर्षे सुरेश जैन तुरुंगात होते. आता 76 वर्षांचे असलेले जैन यांना अनेक आजारही जडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्‍यकता आहे, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले. यापूर्वी त्यांना भायखळा येथील जे. जे. रुग्णालयातही ठेवण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com