परभणीत सुरेश वरपुडकर ठरले किंगमेकर....

परभणीत सुरेश वरपुडकर ठरले किंगमेकर....

परभणी : महापालिकेच्या निवडणुकीत सर्वांचे अंदाज मोडीत काढीत कॉंग्रेसने 31 जागा पटकावल्या असून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर हेच किंगमेकर ठरले आहेत. महापालिकेत पूर्वी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने 18 जागांवर विजय मिळवून लाज राखली तर अंतर्गत कलहामुळे शिवसेनेचे सत्तासंपादनाचे दिवास्वप्नच ठरले. राज्यात सत्ता असतानाही नेतृत्वाच्या अभावामुळे भारतीय जनता पक्षाला संधी असतानाही यश मिळविता आले नाही. आता महापलिकेतल्या बहुमतासाठी दोन जागा कॉंग्रेसला हव्या असून दोन अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता मिळण्याची शक्‍यता सर्वांत अधिक आहे. 

परभणी महापालिकेच्या 65 जागांसाठी चौरंगी लढत पहावयास मिळाली. महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक 2012 मध्ये झाली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस 30 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. कॉंग्रेसला 23 जागांवर विजय मिळवता आला होता. शिवसेना आठ, भाजप दोन तर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. पाच वर्षांच्या कालावधीत सुरवातीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रताप देशमुख यांना पहिले महापौर बनण्याचा मान मिळाला. त्यावेळी कॉंग्रेस विरोधी पक्षात होती. कॉंग्रेसचे भगवान वाघमारे हे विरोधी पक्षनेते होते.

दुसऱ्या अडीच वर्षांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संगीता वडकर या महापौर झाल्या. या वेळी कॉंग्रेसने राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हात मिळवत उपमहापौरपद पदरात पाडून घेतले. विरोधी पक्षनेते असलेले भगवान वाघमारे हे उपमहापौर झाले. तर विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडे गेले. शिवसेनेच्या अंबिका डहाळे या विरोधी पक्षनेत्या म्हणून विराजमान झाल्या. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेसह कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता मिळवायची होती. त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भाजप हे चार प्रमुख पक्ष आमने सामने लढले. राज्यात भाजपची सत्ता असल्याने भारतीय जनता पक्षाकडे तिकिटासाठी मोठी मागणी वाढली होती. त्याचबरोबर शिवसेनेने महापालिकेची सत्ता मिळविण्यासाठी उमेदवार निवडीत मोठी कसरत केली होती.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहरात सर्वेक्षण करून निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरविले होते, परंतु त्यांना अति आत्मविश्वास नडला. तर कॉंग्रेसने पारंपरिक उमेदवारांसह काही नवख्या उमेदवारांना तिकिटे देऊन विजयासाठी प्रयत्न केले होते. महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले, परंतु त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही.

शिवसेनेला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागला. उमेदवारी वाटप करण्यापासून ते प्रचारामध्येही शिवसेनेतील गट-तटाचे राजकारण पहावयास मिळाले. तर भारतीय जनता पक्षाला नेतृत्वाचा अभाव नडला. आता सत्ता स्थापण्यासाठी कॉंग्रेसला चार नगरसेवकांची गरज आहे. त्यामुळे 18 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गतवेळेच्या तुलनेत या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसला सहा जागेचा फायदा झाला आहे. शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला दहा जागेवर फटका सहन करावा लागला आहे. 

पक्षीय बलाबल (2017) 
सदस्य - 65 
कॉंग्रेस - 31 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 18 
भाजप - आठ 
शिवसेना - सहा 
अपक्ष - दोन 


पक्षीय बलाबल (2012) 
सदस्य - 65 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 30 
कॉंग्रेस - 23 
शिवसेना - आठ 
भाजप - दोन 
अपक्ष - दोन 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com