भाजप आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त यांची  बंडखोरी  - Suresh Dhas's son Jaydatta becomes rebel , files nomination | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त यांची  बंडखोरी 

सरकारनामा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019


जयदत्त धस मागच्या तीन वर्षांपासून मतदार संघात तयारी करत आहेत. भिमराव धोंडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडीयातून संताप व्यक्त केला होता . परंतु जयदत्त धस यांच्या बंडखोरीने बीड भाजपमध्ये पेचप्रसंग उभा राहिला आहे . 

आष्टी (जि. बीड) : आमदार भिमराव धोंडे भाजप उमेदवारी दाखल करण्यासाठी सज्ज असतानाच भाजप आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस अपक्ष उमेदवारी अर्ज भरुन मोकळे झाले. आता ते मैदानात राहून बंडखोरी करणार की भाजप नेत्यांकडून काही आश्वासन पदरी पाडून घेऊन माघार घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . 

भाजप आमदार सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस तीन वर्षांपासून मतदार संघात विधानसभा निवडणुक लढविण्याच्या दृष्टीने तयारी करत आहेत. सुरेश धस स्थानिक स्वराज्य संस्थेतून विजयी झाल्यानंतर मतदार संघात त्यांचाच राबता आहे. अगदी त्यांचे समर्थक ‘त्यांचा भावी आमदार’ असाही उल्लेख करतात. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या समोरही ‘आष्टी का आमदार कैसा हो, जयदत्त धस जैसा हो’ अशा आरोळ्या ठोकत शक्तीप्रदर्शनही केले होते. 

त्यांनी भाजपकडून रितरसर उमेदवारीही मागीतली होती. अगदी सुरेश धस यांनीही भिमराव धोंडे सोडून कोणालाही उमेदवारी द्या, असा सुर आळविला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विद्यमान आमदार भिमराव धोंडे यांनाच उमेदवारी जाहीर झाली आणि धस समर्थकांत नाराजी पसरली.

त्यांनी ‘भाजप उमेदवाराला पाडणार, अण्णाच आमचा पक्ष, जयदत्त धसच आमदार होणार’ अशा पोस्ट सोशल मिडीयावर करुन संतापाला वाट करुन दिली. दरम्यान, गुरुवारी दुपार पर्यंत भिमराव धोंडे भाजपची अधिकृत उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पुर्वी जयदत्त धस अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन मोकळे झाले. त्यांच्या सोबत चुलते देवीदास धसही होते. आता पुढे जयदत्त धस रिंगणात राहून बंडखोरी करणार का याकडे लक्ष लागले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख