Suresh Dhas taunts Prakash solanke : your father was rich and my father was poor  | Sarkarnama

धस  सोळंकेना म्हणाले, तुम्ही मोठ्या बापाच्या पोटी जन्मलात आणि ...

दत्ता  देशमुख 
शुक्रवार, 17 जानेवारी 2020


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार सुरेश धसांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आडकाठी आणल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

बीड : आपण जिल्हा परिषद सदस्य, आमदार सोबतच झालो. पण, तुम्ही मोठ्या बापाच्या पोटी जन्म घेतला आणि मी गरिब बापाच्या असे बोल भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना सुनावले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्री. सोळंके व श्री. धस यांच्यातील शाब्दिक चकमक मंत्री धनंजय मुंडे यांच्या मध्यस्थीने थांबली.

मागच्या वेळी जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या सुरेश धस समर्थक पाच सदस्यांनी थेट भाजपला मतदान केले. त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांच्या पत्नी मंगला सोळंके यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हुकले. तेव्हाही दोघांत चांगलीच जुंपली होती. 

दोघांनीही ऐकमेकांच्या घराच्या उतरंडीचे मडके मोजले होते. दोघांनी ऐकमेकांना सिनेमातले विशेषणे आणि अभिनेत्यांची नावे देऊन उणी - दुणी काढली होती. तेव्हा थांबलेला हा अध्याय आता नव्या सरकारमध्ये नव्याने सुरु झाला आहे. 

मागच्या वेळी आढावा बैठकीत सुरेश धस यांनी भूसंपादन, शेतकरी अनुदान, रब्बी पिक विमा असे मुद्दे काढल्यानंतर प्रकाश सोळंके यांनी धसांना खोडा घातला होता. पुन्हा आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत सुरेश धसांनी असेच काही मुद्दे काढल्यानंतर सोळंके यांनी आडकाठी आणली. 

त्यावर धस यांनी आपल्या खास शैलीत ‘तुम्ही काही माझ्यापेक्षा जेष्ठ नाहीत. आपण दोघेही एकदाच जिल्हा परिषद सदस्य, एकाच वेळी आमदार झालो, दोघेही राज्यमंत्री होतो. फक्त फरक एवढाच कि तुम्ही मोठ्या बापाच्या पोटी जन्म घेतला आणि मी गरिब बापाच्या पोटी जन्मलो हाच काय तो फरक असे सुनावले.

 त्यावर सोळंके यांनीही मी कोणाचा अपमान केला नाही, मी नियमाला धरुन बोलत आहे. येथे कामाचे विषय बोला, असे प्रत्युत्तर दिले. दोघांतील शाब्दिक चकमक वाढत जात असतानाच बैठकीचे अध्यक्ष आणि राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप करुन दोघांना थांबविले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख