नमिता मुंदडांच्या विजयासाठी सुरेश धस- रमेश आडसकरांनी लावली फिल्डिंग 

आमदार सुरेश धस हे राजकीय निवडणुक जिंकण्याच्या राजकीय डावपेचातील माहिर मानले जातात. तर, रमेश आडसकर यांची मतदार संघात मोठी ताकद असून त्यांची टिम मुंदडांच्या प्रचारात आघाडीवर आहे.
dhas-mundada-adaskar
dhas-mundada-adaskar

केज : सामाजिक आणि राजकीय रचनेत भाजपला अनुकूल असलेल्या केज मतदार संघात भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या विजयासाठी आमदार सुरेश धस यांनी व्यव्हरचना केली आहे. तर, मतदार संघातील बडे प्रस्थ असलेल्या रमेश आडसकरांनीही त्यांच्या समर्थकांना मुंदडांच्या प्रचारात सक्रीय केले आहे. या सर्व बाबी नमिता मुंदडा यांच्यासाठी जमेच्या मानल्या जात आहेत.


राखीव असला तरी केज मतदार संघ राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत आहे. राष्ट्रवादीने उमेदवरी जाहीर केली. परंतु, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळविली. मतदार संघाची राजकीय आणि सामाजिक रचना ही भाजप पुरक असणे ही नमिता मुंदडा यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मतदार संघात ८० हजारांपर्यंत वंजारी समाजाचे मतदान मतदार संघात आहे. 


या मतदारांवर पुर्वी दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचाच प्रभाव दिसलेला आहे. पंकजा मुंडेंनीच मुंदडांना भाजपमध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांचे बळ मुंदडांना मिळणार हे निश्चितच होते. त्यात भर म्हणून आता सुरेश धस यांनीही केज मतदार संघात मुंदडांसाठी लक्ष घालून विजयासाठीची व्यव्हरचना आखून दिली आहे. 


राजकारणातील बेरकी समजले जाणारे सुरेश धस राजकीय डावपेचातही माहिर आहेत. सरपंचपदापासून त्यांची सुरु झालेली राजकीय कारकिर्द झेडपी सदस्य, झेडपीचे उपाध्यक्ष आणि चार वेळा आमदार व मंत्री अशी राहीलेली आहे.

विरोधकांवरच डाव उलटवून ऐनवेळी संस्थांवर विजयाचा झेंडा रोवणे, प्रतिकुल परिस्थितीत विजय मिळविणे असे अनेक राजकीय डाव खेळत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात नवी राजकीय समिकरणे घडवून आणली आहेत.

धस आणि मुंदडांचे व्यक्तीगत संबंध असल्याने आता धसांनी केजमध्ये नमिता मुंदडांसाठी लक्ष घातले आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी मतदानापर्यंतची राजकीय व्यव्हरचनाच नंदकिशोर मुंदडा व अक्षय मुंदडा यांना आखून दिली आहे. 


तसे, दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा यांनी मतदार संघात केलेली विकासाचे कामे आणि मागच्या पाच वर्षांपासून मतदार संघात राजकीय आणि सामाजिक माध्यमातून सक्रीय असलेल्या मुंदडांना धसांनी आखून दिलेल्या राजकीय वाटेवरुन चालणेही सोपे आहे. त्यातच आता रमेश आडसकर यांनीही आपली ताकद नमिता मुंदडा यांच्या पारड्यात टाकली आहे. 

मतदार संघातील बडे प्रस्थ असलेल्या रमेश आडसकर यांचा मतदार संघात सहकारी साखर कारखाना, ग्रामपंचायती, बाजार समिती, शिक्षण संस्था अशी ताकद आहे. त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन मुंदडांच्या प्रचाराच्या सुचना दिल्या आहेत.

त्यामुळे आडसकर टिमही मुंदडांच्या प्रचारात आघाडीवर आहे. दरम्यान, नंदकिशोर मुंदडांनी ३० वर्षांच्या काळात उभारलेली समर्थकांची फळी आणि दांडगा जनसंपर्क आणि अक्षय मुंदडा यांची यंग ब्रिगेडला आता पंकजा मुंडेंचे बळ, धसांची व्युहरचना  आणि आडसकरांची ताकद लाभली  आहे. त्यामुळे नमिता मुंदडांच्या गाडीने चांगलाच वेग पकडला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com