धस सोंगाड्या : पंडित, प्रकाश सोळंके यांचे टीकास्त्र

धस सोंगाड्या  :  पंडित, प्रकाश सोळंके यांचे टीकास्त्र

बीड : राष्ट्रवादीतील माजी मंत्री सुरेश धस यांच्यावर पक्षाने सहा वर्ष निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांच्यापासून जिल्ह्यातील सर्वच नेत्यांवर आगपाखड केली होती. प्रकाश सोळंके यांचा भप्पी लहरी, तर अमरसिंह पंडित यांचा सरकटे बंधू असा उल्लेख करत त्यांना कानफुके ठरवले होते. धस यांनी पंडित व सोळंके यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतल्यावर आता या दोघांनी देखील धस यांना खलनायक, सोंगाड्या, डाकू, आगलाव्या, तमासगीर, उलट्या काळजाचा अशा विविध उपाध्या देत आपली मळमळ व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता गमावल्यापासून धस विरुद्ध जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते असा कलगीतुरा रंगला आहे. 

राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकत जिल्हा परिषदेच्या सत्तेवर दावा सांगितला होता. पण सुरेश धस यांच्या एका खेळीने राष्ट्रवादीचे मनसुबे उधळले गेले. याचा सर्वाधिक फटका बसला तो माजी मंत्री प्रकाश सोळंके यांना पत्नी मंगला सोळंके यांच्यासाठी अध्यक्षपदाची उमेदवारी पक्षाकडून पदरात पाडून यश मिळाल्यावर धस यांच्या गद्दारीमुळे त्यांना अध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे पक्षाकडे धस यांच्यावर कारवाई करण्याचा धोशा लावून सोळंके यांनी धस यांच्यावर कारवाई करण्यास पक्षश्रेष्ठींना भाग पाडले. 6 वर्ष पक्षातून निलंबित केल्यामुळे धस यांनी कार्यकर्ता मेळावे घेत धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित या त्रिमुर्तींच्याविरोधात दंड थोपटत आरोपाच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली होती. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर थेट हल्ला चढवत धस यांनी त्यांना "कानफुके' असे संबोधले होते. याशिवाय प्रकाश सोळंके यांना "भप्पी लहरी', तर अमरसिंह पंडित यांना सरकटे बंधू असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. 
कलगीतुऱ्याने बीडवासीयांचे मनोरंजन 
सुरेश धस यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी अमरसिंह व प्रकाश सोळंके देखील मैदानात उतरले आहेत. बीडमध्ये खास पत्रकार परिषद घेऊन या दोघांनी सुरेश धस यांना खलनायक, सोंगाड्या, डाकू, आगलावे, विध्वंसात आनंद मानणारे, तमासगीर, उलट्या काळजाचा अशी शेलकी विशेषणे लावली. "धस यांना धमेंद्र हे नाव शोभते, कारण त्यांच्या प्रमाणेच धस हे देखील जानी मै तुम्हारा खून पी जाऊंगा' असा डायलॉग नेहमी मारत असल्याचे सोळंके म्हणाले. दोन बायका हे देखील धर्मेद्र आणि धस यांच्यातील साम्य आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. एकूणच आरोप-प्रत्यारोप करताना राष्ट्रवादीतील या आजी-माजी नेत्यांनी खालची पातळी गाठल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. 

धस यांच्या पत्नीचा पराभव घरातूनच 
आपल्या पत्नीला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीतील नेत्यांनीच विरोधकांना पैसे पुरवल्याचा आरोप धस यांनी केला होता. हा आरोप खोडून काढतांना धस यांच्या पत्नीची पराभव त्यांच्या दुसऱ्या पत्नीमुळेच झाल्याचा दावा पंडित, सोळंके जोडगळीने केला. त्यामुळेच धस यांची गत दोन बायका फजिती ऐका अशी झाल्याचे ते म्हणाले. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात धस जयललितांच्या पक्षात जाऊ असे सांगतात यावर त्यांचे बोलणे, नकला लालू प्रसादांच्या पक्षाला शोभणाऱ्या आहेत. त्यामुळे धस यांनी लालूंच्या पक्षात जावे असा सल्लाही यावेळी देण्यात आला. अमरसिंह पंडित यांनी धस यांच्या गद्दारीचा उल्लेख करतांना त्यांना आखरी रास्ता चित्रपटातील सदाशिव अमरापूरकर यांची उपमा दिली. एकूणच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणावर भविष्यात एखादा चित्रपट निघाल्यास नवल वाटायला नको असा सूर जनतेतून निघत आहे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com