supriya sule writes letter to cm uddhav | Sarkarnama

सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पहिले पत्र

मिलिंद संगई
रविवार, 1 डिसेंबर 2019

...

बारामती शहर : केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेस या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर सुळे यांनी पहिलेच पत्र पाठवून नव्या सरकारकडे ही मागणी केली.

मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात सुप्रिया सुळे म्हणतात की केंद्राच्या धर्तीवर व मार्गदर्शक तत्त्वानुसार मागील अनेक वर्षांपासून दिव्यांग (अपंग) कल्याण विभाग महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित आहे. राज्यातील दिव्यांगांच्या वतीने मी विनंती करते की या पूर्वी दिव्यांगांच्या दिव्यांगत्वाचे सात प्रकारचे दिव्यांग गृहीत धरले जायचे. दिव्यांगाच्या सन 2016 पासूनच्या कायद्यामध्ये 21 प्रकार सामावले आहेत. त्या मुळे दिव्यांग विभागाच्या कामाची व्याप्ती वाढली आहे.

दिव्यांगाच्या बळकटीकरणासाठी देशपातळीवरील इतर राज्यात म्हणजेच छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली, तामिळनाडू राज्यात दिव्यांगासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत सचिव ते जिल्हा पातळीवर स्वतंत्र विभागाची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या सहा टक्के लोकसंख्या दिव्यांगाची आहे, परंतु महाराष्ट्रात दिव्यांग विभाग स्वतंत्र झाला नाही. या बाबत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडून पत्रव्यवहार करुन अंमलबजावणी झालेली नाही. आपण दिव्यांग विभाग राज्य पातळीवर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत सचिव ते जिल्हा पातळीवर स्वतंत्र घोषित केला तर 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने दिव्यांगाना नवीन प्रशासनाकडून मिळालेली भेटच ठरेल. आपण हा विभाग लवकर जाहीर करावा, अशी मागणी सुळे यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख