Supriya Sule taunts Harshavardhan Patil | Sarkarnama

भांडण दिराशी आणि फारकत नवऱ्याला ,असे हर्षवर्धन पाटलांचे झालेय : सुप्रिया सुळे

सरकारनामा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

स्थायी समितीच्या सभापती पदावर हर्षवर्धन पाटील त्यांच्या मुलीची नेमणूक करू इच्छित होते. तेव्हा त्यांना कॉंग्रेसमधूनच विरोध झाला. पण आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहिलो . -खासदार सुप्रिया सुळे

औरंगाबादः कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणे म्हणजे, भांडण झालय  दिराशी आणि नवऱ्याला सोडून चालले  नवऱ्याला ,असा प्रकार असल्याचा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
 इंदापुरच्या जागे संदर्भात आघाडीमध्ये अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही, मी त्यांच्यांशी फोन, व्हॉटसऍप, मेसेज अशा सगळ्या मार्गांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कुटुंबियांशी बोलण्याचे प्रयत्न केले,पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. दोन दिवस ते न रिचेबल होते . कॉंग्रेस सोडतांना त्यांनी राष्ट्रवादीवर केलेले आरोप चुकीचे असल्याचेही सुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय परिस्थीती, भाजपमध्ये होणारी मेगाभरती, आर्थिक मंदी, हर्षवर्धन पाटील यांचा कॉंग्रेस प्रवेश आदी विषयावर आपली भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या, हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कुटुंबाशी आमचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. पण कॉंग्रेस सोडण्यापुर्वी त्यांनी जी काही भाषणे केली ती ऐकून मला धक्का बसला.

राहूल गांधी, सोनिया गांधी आणि माझी बैठक झाली आणि त्यात इंदापूरच्या जागेवर चर्चा झाली हा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. अशी कुठलीही बैठक आमच्यामध्ये झालेली नाही. शिवाय आघाडीच्या जागा वाटपांच्या चर्चेत देखील इंदापूरवर चर्चा झालेली नाही. यावर निर्णय झालेला नसतांना पाटील यांनी कॉंग्रेस पक्ष कसा सोडला याचेच मला आश्‍चर्य वाटते.

उलट त्यांची मुलगी जिल्हा परिषदेत निवडणुक लढवत असतांना आम्ही पाठिंबा  दिला. स्थायी समितीच्या सभापती पदावर हर्षवर्धन पाटील त्यांच्या मुलीची नेमणूक करू इच्छित होते. तेव्हा त्यांना कॉंग्रेसमधूनच विरोध झाला. पण आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहिलो याची आठवण देखील सुप्रिया सुळे यांनी करून दिली. बर तुमच भांडण राष्ट्रवादीशी आहे, मग कॉंग्रेस पक्ष का सोडला? असे म्हणत हे म्हणजे भांडण दिराशी आणि नवऱ्याला सोडण्याचा प्रकार असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख