supriya sule on professional politics | Sarkarnama

प्रत्येक पक्षात 30 टक्‍के व्यावसायिक राजकारणी : सुप्रिया सुळे  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

शिवसेना कन्फ्यूज पार्टी आहे. त्यांना आपण काय करतो हे समजत नाही. सत्तेत राहून आंदोलन करणे म्हणजे मोठा जोकच आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्येक पक्षात 30 टक्‍के व्यावसायिक राजकारणी असल्याचेही त्या म्हणाल्या. 

कोल्हापूर : शिवसेना कन्फ्यूज पार्टी आहे. त्यांना आपण काय करतो हे समजत नाही. सत्तेत राहून आंदोलन करणे म्हणजे मोठा जोकच आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रत्येक पक्षात 30 टक्‍के व्यावसायिक राजकारणी असल्याचेही त्या म्हणाल्या. 

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ""समाजातील विविध घटकांचे प्रश्‍न समजून घेण्यासाठी या विषयांवर कार्यकर्त्यांशी मनमोकळेपणे संवाद साधण्यासाठी राज्याचा दौरा करत आहे. सध्या समाजातील कोणताही घटक या सरकारच्या कारभारावर समाधानी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, महिला सुरक्षित नाहीत, शेतीला वीज मिळत नाही, पारदर्शी कारभाराच्या गप्पा मारणाऱ्या आणि महागाई कमी करण्याचे आश्‍वासन देणाऱ्या या सरकारच्या काळात सर्वांचेच भाव वाढले आहेत. शेतमालाला मात्र भाव मिळत नाही. कर्जमाफीची केवळ घोषणा झाली आहे. शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येते. पण आमच्या आंदोलनाची पद्धत वेगळी आहे. दूध रस्त्यावर ओतून आंदोलन करण्याची आमची पद्धत नाही. कारण दूध हे पूर्ण अन्न समजले जाते. अन्नाची नासाडी करून आंदोलन करण्याची आमची संस्कृती नाही. आंदोलनेही जबाबदारीने केली जातात. राज्यात विजेची माहिती आपण संकलित करत आहोत. या सरकारला डेटा खूप आवडतो. त्यामुळे हा डेटा एकत्र करून सरकारला सादर केला जाईल.'' 

शिवसेनेच्या भूमिकेबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ""मुळात शिवसेना एक कन्फ्यूज पार्टी आहे. सत्तेत राहून लोकांचे प्रश्‍न सोडवायचे असतात. त्यासाठीच लोकांनी सत्तेवर बसवलेले असते; मात्र सत्तेत राहून शिवसेना करत असलेले आंदोलन म्हणजे जोकच आहे. काही लोकांनी राजकारण व्यवसाय केला आहे. प्रत्येक पक्षात असे तीस, पस्तीस टक्‍के लोक असतात. सत्ता आली की, त्या बाजूला झुकतात. मग सत्ता कोणाची का असेना. त्यांना काही फरक पडत नाही. आजही तीच मंडळी आमच्यातून बाजूला गेली आहेत, पण त्यांचे काम काही दिसत नाही. आमच्याकडे होती तेव्हा ते लोक किमान चांगले काम तरी करत होते.'' 

इकबाल कासकरला अटक केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्‍तव्याबद्दल त्या म्हणाल्या, ""पोलिस अधिकाऱ्यांनी संवेदनशील प्रकरणात जबाबदारीने वक्‍तव्य करणे आवश्‍यक आहे. राजकारण्यांशी संबंध असल्याचे सांगण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रथम त्याची सखोल चौकशी करून माहिती घेणे व संबंधितांना अटक करणे आवश्‍यक होते. मग तो कार्यकर्ता कोणत्याही पक्षाचा असो. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी वक्‍तव्य करणे योग्य झाले असते, पण तसे झाले नाही. घाईघाईने बेजबाबदार विधान करणे जबाबदार अधिकाऱ्यांना शोभत नाही.'' 

परराज्यातील एखाद्या विद्यार्थ्याला आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणे जमत नाही. केवळ बाहेरच्या राज्यातील म्हणून त्या विद्यार्थ्याला मिळणारे लाभ नाकारले जातात. यासंदर्भात आपण व खासदार धनंजय महाडिक लोकसभेत निश्‍चित आवाज उठवू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
या वेळी महापौर हसीना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, नाविद मुश्रीफ, आदिल फरास, भैया माने, अनिल साळोखे आदी उपस्थित होते. 

कोळसा गेला कुठे? 
कॉंग्रेस सरकारच्या काळात कोळशाचे नियोजन केले होते. त्यावेळी भाजपने आरोप केले होते, पण पारदर्शी कारभार करणाऱ्या भाजप सरकारच्या काळात मात्र कोळसा अचानक गायब झाला आहे. त्यामुळे भारनियमन वाढले आहे. यासंदर्भातील डाटा सरकारला सादर करणार आहोत. कारण या सरकारला डाटा खूप आवडतो. असेही खासदार सुळे म्हणाल्या. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख