'फडणवीस सरकार,हाय - हाय'च्या घोषणांनी मुंबई दणाणली

मोर्चानंतर अत्याचारित तरुणीच्या भावाला सोबत घेऊन सुप्रिया सुळे यांनी शिष्टमंडळासह पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांची भेट घेऊन त्वरित कारवाईची मागणी केली .
NCP-Morcha-in-Mumbai
NCP-Morcha-in-Mumbai

मुंबई  :  'होश मे आओ, होशमे आओ, फडणवीस सरकार, होशमे आओ'... 'महिलाओंके सम्मानमे राष्ट्रवादी मैदानमे'... 'बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो'...'फाशी द्या फाशी द्या बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या',  'फडणवीस सरकार हाय हाय' अशा घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने शुक्रवारी मुंबई दणाणून सोडली.

राज्यातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे व मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्च्यात हा संताप दिसून आला.

चेंबूर येथे १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली. जोपर्यंत सबंधित पिडीत तरुणीच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

जालना जिल्ह्यातील 19 वर्षीय तरुणी चेंबूरमधील आपल्या नातेवाईकांकडे आली होती. 7 जुलै रोजी 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याविरोधात तरुणीच्या कुटुंबीयांनी औरंगाबादेतील बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही तक्रार नंतर चुनाभट्टी पोलिस ठाणे येथे वर्ग करण्यात आली.

दरम्यान, बुधवारी (ता. 28) उपचार सुरू असताना तरुणीचा मृत्यू झाला; मात्र महिना उलटूनही चुनाभट्टी पोलिसांना अद्याप एकाही आरोपीला अटक करता आलेली नाही.त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीने चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता .    

राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात  राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतलेला दिसला .  सरकारविरोधात  चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा  मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो  महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात सर्वसामान्य मुंबईकर जनताही सहभागी झालेली पाहावयास मिळाली. चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर  मोर्चा आल्यावर पोलिसांनी तो अडवला.

 त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसं नाही झालं तर यापेक्षा मोठया पध्दतीचा व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, आमदार विदया चव्हाण, मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या राखी जाधव, युवती अध्यक्षा अदिती नलावडे, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले आदी या मोर्च्यात सहभागी झाले होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com