Supriya Sule demands Phdanvis's statement on flood situation | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी 'पारदर्शक'पणे महापुराची माहिती सांगावी : खा. सुप्रिया सुळे

संजय मिस्कीन 
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

'पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे . - सुप्रिया सुळे

मुंबई : 'पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे . त्यामुळे पुरग्रस्त जिल्हयात काय परिस्थिती आहे हे पारदर्शकपणे सगळ्यांना सांगण्याची गरज आहे ,असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज मंत्रालयात  वार्ताहरांशी बोलताना लगावला.

 राष्ट्रवादी काॅग्रेस वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने पुरग्रस्तांसाठी 51 ला रूपयांचा धनादेश त्यांनी आज मुख्यमंत्र्याच्या हाती सुपुर्त केला. त्यानंतर त्या बोलत होत्या. 

पुरग्रस्तांना तातडीची मदत पोचवणं, त्यांना औषधांचा साठा देणं आणि त्यांची घरं तात्काळ कशी उभी करता येतील हे पाहणं गरजेचं आहे. हे भावनिक विषय आहेत. नुसतं घर दिलं, बिस्किटचा पुडा दिला की आपली जबाबदारी संपणार नाही. आपल्याला तिथे सगळ्यांना जावून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी आपली आहे, असेही त्या म्हणाल्या.

शरद पवार मुख्यमंत्री असताना लातुरचा भूकंप झाला होता. त्यावेळी सलग 15 दिवस प्रशासन घेवून ते लीड करत होते अशी आठवणही त्यांनी सांगितली. जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी तिथे जावून मांडी घालून बसलंच पाहिजे आणि लोकांना वेळ दिला पाहिजे ,असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमचे सगळे नेते विशेषतः अजित दादा, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींसह सगळेच नेते पुररग्रस्तात जावून अंग झटकून काम करत आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे ,असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख