Supporters Want Krishna Valley Corporation to Shivsena Mla Anil Babar | Sarkarnama

अनिल बाबर यांना 'कृष्णा खोरे' मिळण्याची कार्यकर्त्यांची अपेक्षा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 जानेवारी 2020

गेल्या दोन दिवसात सोशल मीडियासह कार्यकर्ते अनिल बाबर जलसंपदा मंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त करत होते. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. किमान कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

विसापूर  : मतदारसंघातील शेवटच्या गावापर्यंत योजनेचे पाणी पोहोचवणाऱ्या पाणीदार नेते आमदार अनिल बाबर यांना वगळल्याने विसापूर सह 21 गावात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गट तट न पाहता सर्वांनाच न्याय देणाऱ्या बाबर यांना संधी न मिळाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. किमान आता कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलमधुन बाबर दुसऱ्यांदा शिवसेनेकडून आमदार झाले. दोन्ही निवडणुकीत त्यांनी दिग्गजांना धोबीपछाड केले. शिवसेनेचे आमदार असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्याचबरोबर खासदार संजय पाटील यांच्याशी मिळतेजुळते घेतले. खासदार संजय काका यांच्या कृष्णा खोरे महामंडळाच्या पदाचे सहकार्य घेत त्यांनी आकाराने मोठा असलेल्या मतदारसंघात ताकारी, टेंभू व आरफळचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविले. पाणीदार नेता म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

साहजिकच या वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सेना भाजपसह कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही मदत केली. बाबर दुसऱ्यांदा आमदार झाले.मंत्रिमंडळ विस्तारात भाऊना जलसंपदा सारखे चांगले खाते मिळेल अशी अपेक्षा होती. टेंभू ताकारी सारख्या योजना वर बाबर यांनी आमदारकी पणाला लावली. गेल्या पाच वर्षात विकास कामापेक्षा शेतीला पाणी मिळावे, यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. त्यामुळे अशक्‍य असणाऱ्या गावाला सुद्धा पाणी मिळाले. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा होती. 

गेल्या दोन दिवसात सोशल मीडियासह कार्यकर्ते बाबर जलसंपदा मंत्री होतील अशी अपेक्षा व्यक्त करत होते. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे. किमान कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळावे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख