सनी देओल व्यायामाचे साहित्य घेऊन गुरूदासपूरला निवडणुकीसाठी दाखल - Sunny Deol Reaches Gurudaspur with Fitness kit | Politics Marathi News - Sarkarnama

सनी देओल व्यायामाचे साहित्य घेऊन गुरूदासपूरला निवडणुकीसाठी दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

सनी देओल मिठाई, जंकफूड, सिगारेट आणि दारू या गोष्टींना स्पर्शही करीत नाही. तो दररोज एक तास प्राणायाम आणि योगा करतो.

अमृतसर :  गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी मिळालेला चित्रपट अभिनेता सनी देओल खास विमानाने बुधवारी अमृतसरला पोहोचला. फिटनेस फ्रीक असलेल्या सनीने व्यायामाची साधनेही आपल्याबरोबर मुंबईहून आणली आहेत.

सनीबरोबर त्याचा भाऊ बॉबी देओलदेखील आलेला असून दोघांनी 13-14 बॅग भरून आपले सामान आणले आहे. गुरुदासपूर मतदारसंघाचे मतदान 19 मे रोजी अंतिम टप्प्यात होणार आहे. तोपर्यंत हे दोघे भाऊ तेथे प्रचारासाठी तळ ठोकून बसले आहेत.

सनी देओल 63 वर्षांचा आहे. आपल्या फिटनेसबाबत अत्यंत जागरूक नट म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे प्रचाराच्या धामधुमीतही दररोज पहाटे तो व्यायाम करणार असल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

सनी देओल धावणे, पोहणे, चालणे आदी व्यायाम नियमित करतो. तो दररोज एक तास प्राणायाम आणि योगा करतो. टेबल टेनिस आणि स्क्वॅशही तो नियमित खेळतो. त्याला ट्रेकींगचीही आवड आहे. सनी देओल मिठाई, जंकफूड, सिगारेट आणि दारू या गोष्टींना स्पर्शही करीत नाही.

1982 मध्ये 'बेताब' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री घेतलेल्या सनी देओलचे अर्जुन, घायल, नरसिंहा, दामिनी, बॉर्डर, गदर असे चित्रपट गाजलेले आहेत.

सनी देओलला पाहण्यासाठी त्याचे चाहते गर्दी करीत असले तरी त्याने व्यायामापेक्षा भाषणाच्या सरावावर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत असावे . 

-------

सनी देओलच्या फक्त दोन मिनिटांच्या भाषणामुळे भाजप नेते अस्वस्थ

http://www.sarkarnama.in/sunny-deol-speech-proves-fiasco-36864

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख