बापू पठारे मुळिकांना मिळाले; पण सुनील टिंगरे दोघांनाही यशस्वीपणे भिडले

बापू पठारे मुळिकांना मिळाले; पण सुनील टिंगरे दोघांनाही यशस्वीपणे भिडले

पुणे : राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांनी ऐन निवडणुकीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. पठारे यांच्या प्रवेशाने आमदार मुळीक यांचा विजय निश्‍चित वाटत होता. मात्र, पठारेंमागे त्यांचा मतदार आलाच नाही. मुळीक यांच्याविषयी असलेली नाराजीदेखील मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केली. परिणामी मुळीक यांना पराभवाचा सामना करावा लागला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मुळीक पाच हजार 325 मतांनी विजयी झाले होते. यावेळी ते चार हजार 956 मतांनी पराभूत झाले. पठारे यांना उमेदवारी न देता यावेळी राष्ट्रवादीने टिंगरे यांना प्राधान्य दिले.

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गिरीश बापट यांना तब्बल 62 हजार मतांचे अधिक्‍य मिळाले होते. त्यानंतर केवळ सहा महिन्यात झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल सत्ताधाऱ्यांना विचार करायला लावणारा आहे. 

वडगाव शेरी हा मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. उच्च शिक्षित मतदारांबरोबरच अशिक्षित मतदारदेखील या मतदारसंघात आहे. आयटीमध्ये काम करणाऱ्या मतदारांसोबत झोपडपट्टीत राहणारा मतदार मोठ्या संख्येने या मतदारसंघात आहे. मतदारसंघातील विकासकामे करण्यात आपण कमी पडलो नाही, असा मुळीक यांचा दावा राहिलेला आहे. मात्र, बापू पठारे भाजपत आल्याने त्याचा फायदा झाला की तोटा, याचा आता विचार भाजपवाले करीत आहेत. 

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्‍क्‍यामुळे भारतीय जनता पार्टीचे पुण्यातील कारभारी आणि मुळीक हेदेखील काहीसे अतिविश्वासात राहिले असावेत, असे या निकालावरून वाटते. आपल्याला इतका विरोध होऊ शकतो हा अंदाज ना नेत्यांना आला ना उमेदवारांना अशी परिस्थिती आहे. वास्तविक निवडणुकीची यंत्रणा उभी करण्यात आणि ती राबविण्यात भाजपाचा हात कुणी धरू शकत नाही, असे सांगितले जाते. मात्र, या यंत्रणेला या धोक्‍याची जाणीव वेळेत झाली नाही का, असा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

हा मतदारसंघ जिंकता येईल की नाही, याची शंका निर्माण सुरवातीला झाली होती. पण पक्ष सोडणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सुनील टिंगरे यांच्या पाठीशी पक्ष निर्धास्तपणे उभा राहिला. हा मतदारसंघ जिंकता येऊ शकतो, याची खात्री पटल्याने राष्ट्रवादीच्याही वरिष्ठ नेत्यांनी मग टिंगरेना सर्व प्रकारची मदत केली. मतदानाच्या दोन दिवस आधी कुमक चांगली मिळाल्याने मग टिंगरे यांनीही जोमाने लढत देत मुळीक यांचा पराभव केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com