sunil tatkare on bjp | Sarkarnama

भाजपवाले आता "वाल्या' बनू लागलेत! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मे 2017

राष्ट्रवादी आता अधिक संघटितपणे सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात गावागावात जाऊन संघर्ष करणार आहे. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत आम्ही अकरा जूनपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. 34 जिल्हे आणि प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात संघटनात्मक बांधणी करणार आहोत, असे तटकरे म्हणाले. 
 

सातारा : पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला भक्कम आहे. राष्ट्रवादी विरोधात संशयाचे वातावरण निर्माण करून वावड्या उठविण्याचे काम भाजपची नेतेमंडळी करित आहेत. माढा, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे खासदार भाजपमध्ये जाणार नाहीत. भाजप हा आयारामांचा पक्ष बनला आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. 

कोल्हापूरहून रोह्याकडे एका कार्यक्रमासाठी जाताना श्री. तटकरे येथील राष्ट्रवादी भवनात थांबले. त्यांनी पक्षाच्या आमदारांशी चर्चा करून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, सभापती मनोज पवार, राजकुमार पाटील उपस्थित होते. 

तटकरे म्हणाले, भाजपमध्ये गेलेली माणसे "वाल्या'ची वाल्मिकी झाली. मात्र भाजमधील माणसे आता वाल्मिकीचा "वाल्या' बनू लागली आहेत. भाजपमध्ये जे आमदार व इतर सदस्य निवडून आलेले आहते, ते आयात केलेले आहेत. त्यामुळे भाजप हा आयारामांचा पक्ष बनला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाला फारसे यश मिळाले नाही. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीविरोधी वातावरण तयार केले होते. मात्र जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचीच निर्विवाद सत्ता आली. भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी विरोधी चर्चा करूनही त्यांना सत्ता मिळविता आली नाही. त्यांना त्यांचे काम करू द्या, आम्ही आमचे काम करत आहोत.

सेवा वस्तू विधेयकाचा आघाडी सरकारने पाया रचला. त्यावेळी भाजपची सत्ता असलेल्या राज्यांनी या विधेयकाला विरोध केला होता. सत्तांतरानंतर भाजप सरकारने जीएसटी करप्रणाली लागू होणार म्हणून घाई गडबडीत एलबीटी रद्द केला. यामुळे राज्याचे 60 हजार कोटींचे नुकसान केले. संघर्ष यात्रेतून आमचा हेतू साध्य झाला असून आता सरकार कर्जमाफीचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही सर्व विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी केली आहे. 

नुकतीच समृध्दी मार्गाची घोषणा झाली. याला शेतकऱ्यांचा विरोध असून विरोधामागची कारणे आम्ही समजून घेऊन मगच आमचा निर्णय जाहीर करणार आहोत, असे सांगून तटकरे म्हणाले, सरकारकडून केवळ लोकप्रियतेच्या घोषणा होत असून कोणतेच निर्णय घेतले जात नाहीत. गेल्या अडीच वर्षात दहा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. केवळ कर्जबाजारीपणामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत.

कर्जमाफी प्रश्‍नावर सरकारला धारेवर धरणारी शिवसेना पालिसारखी सत्तेला चिकटून बसली आहे. खिशात राजीनामे घेऊन फिरणारे सेनेचे मंत्री आता गप्प का आहेत, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांबाबत शासनाची दुटप्पी भुमिका आहे. जीएसटीला विरोध करायला गेले तर मुख्यमंत्र्यांनी नुकते डोळे वटारले अन्‌ शिवसेनेच्या मंत्र्यांचे मांजर कधी झाले ते कळले नाही. हे सरकार दरोडेखोरांचे, नालायकांचे आहे, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आरोप म्हणतात, पण 20 टक्के मंत्री शिवसेनेचे आहेत हे ते विसरत आहेत.25 वर्षात प्रथमच 195 आमदारांचा पाठिंबा असलेले राज्याचे प्रबळ पण तितकेच दुर्बल सरकार असल्याची टिका त्यांनी केली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख