विक्रोळीमध्ये सुनील राऊत, सिद्धार्थ मोकळे, विनोद शिंदे, धनंजय पिसाळ यांच्यात लढत - sunil raut, shidharth mokle, vinod shinde and dhananjay pisal tussle in vikroli | Politics Marathi News - Sarkarnama

विक्रोळीमध्ये सुनील राऊत, सिद्धार्थ मोकळे, विनोद शिंदे, धनंजय पिसाळ यांच्यात लढत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

विक्रोळी मतदारसंघातील कागदावरचे गणित सध्या तरी शिवसेनेच्या बाजूचे आहे. भाजपची साथ असल्याने त्यांचेच पारडे सध्या जड आहे; पण शिवसेनेची लोकप्रियता घसरली असेल तर त्यांना फटकाही बसू शकतो.

मुंबई : विक्रोळी मतदारसंघातील कागदावरचे गणित सध्या तरी शिवसेनेच्या बाजूचे आहे. भाजपची साथ असल्याने त्यांचेच पारडे सध्या जड आहे; पण शिवसेनेची लोकप्रियता घसरली असेल तर त्यांना फटकाही बसू शकतो.

पूर्व उपनगरांमधील मुलुंड आणि घाटकोपर अशा गुजरातीबहुल मतदारसंघाशेजारचा विक्रोळी मतदारसंघ मराठीबहुल म्हणून ओळखला जातो. इथे शिवसेनेचे विद्यमान आमदार सुनील राऊत, वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनोद शिंदे व कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे धनंजय पिसाळ यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

विक्रोळी मतदारसंघात सध्या शिवसेनेचे सुनील राऊत आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला बालेकिल्ला परत घेण्यासाठी पुढे सरसावली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय पिसाळ हेदेखील आक्रमकरित्या प्रचार करत आहेत. दुसरीकडे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजाची मते आहेत. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीनेही तयारी केली आहे. शिवसेनेची लोकप्रियता घसरली असेल तर इथे चुरशीची लढत होऊन त्यांना फटका बसू शकतो.

विक्रोळी मतदारसंघात भांडुप पूर्व, कांजूरमार्ग पूर्व, कन्नमवारनगर, टागोरनगर, हरियाली व्हिलेज, सूर्यनगर, पवई आयआयटी आदी भागांचा समावेश आहे. सहा प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक नगरसेवक, भाजपचे दोन नगरसेवक आणि शिवसेनेचे तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे कागदावर तरी त्यांचे पारडे सध्या जड आहे आणि मागील निवडणुकीची आकडेवारीही तेच सांगते. त्यावेळी राऊत यांनी तेव्हाचे आमदार मंगेश सांगळे यांचा 25 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र, आता राऊत यांच्याविरोधातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे ही मते एकत्र आली तर शिवसेनेला घाम फुटू शकतो.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संजय दीना पाटील व कॉंग्रेसच्या संदेश म्हात्रे यांना मिळून 38 हजार मते पडली होती. तर 2009 च्या तुलनेत मनसेची मतेही निम्मी कमी झाली आहेत. या पक्षाची घसरत चाललेली लोकप्रियता पाहता त्यांची मते आणखी कमी झाली तर ती आपल्याच पारड्यात पडतील या आशेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय पिसाळ जोरदार प्रचार करीत आहेत. 
2009 मध्ये जिंकलेली ही जागा पुन्हा ताब्यात आणण्यासाठी मनसेचा प्रचार सुरू आहे; पण त्यांना कितपत यश मिळेल याविषयी जाणकार साशंक आहेत. अर्थात आता भाजपचा अधिकृत पाठिंबा शिवसेनेला असल्याने युतीची बाजू वरचढ आहे. मात्र काही टक्के जरी मते फिरली तरी चुरस चांगलीच वाढू शकते.

विक्रोळी विधानसभा मतदारसंघात एकूण 2,27,000 मतदार आहेत. पुरुष मतदार 53 टक्के आहेत; तर स्त्री मतदारांची टक्केवारी 47 टक्के आहे.

मतदारसंघातील प्रमुख समस्या
कन्नमवारनगरचा काही भाग सीआरझेडमध्ये येतो. त्यामुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. भविष्यात अनेक इमारतींचा पुनर्विकास या भागात होणार आहे. मात्र त्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांचा अभाव या मतदारसंघात आहे. कामगार कल्याण परिसरात विक्रोळीकरांसाठी जलतरण तलावाचा नारळ फोडण्यात आला; पण अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. पालिका रुग्णालयाचीही मोठी समस्या या भागात आहे. कांजूर, भांडुप या ठिकाणी बैठ्या चाळींचा प्रश्‍न आहे.

2014 च्या निवडणुकीतील मते
- सुनील राऊत (शिवसेना) : 58,556
- मंगेश सांगळे (मनसे) : 24,963
- संजय दीना पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस) : 20,233
- संदेश म्हात्रे (कॉंग्रेस) : 18,046
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख