Sunil Rane's position becomes stronger by Shetty - Tawde's support | Sarkarnama

 शेट्टी - विनोद तावडे यांच्या पाठिंब्यामुळे सुनील राणे  मजबूत

कृष्णा जोशी 
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

विनोद तावडे यांनी उमेदवारी न मिळाल्यानंतरही शिस्तबद्ध कार्यकर्त्याप्रमाणे पक्षासाठी काम करण्याची हमी दिली होती. ते शब्द त्यांनी आता कृतीत आणल्याने कार्यकर्ते समाधान व्यक्त करीत आहेत.

मुंबई : उत्तर मुंबईतील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याऐवजी शिक्षणतज्ञ सुनील राणे यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते नाराज झाले होते.

मात्र उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि खुद्द शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात हजर राहून सर्वांना एकजुटीने सुनील राणे यांच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले.

यानंतर जवळपास सर्वच कार्यकर्ते सुनील राणे यांच्या प्रचारात सहभागी होत असून त्यामुळे राणे यांची अवस्था बळकट झाल्याचे मानले जात आहे.

तावडे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची तसेच बोरिवलीच्या भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी सुनील राणे यांना त्रासदायक होईल का अशी शंका व्यक्त केली जात होती.

मात्र त्या सर्व शंकांना आता पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात असून कार्यकर्ता मेळाव्यात शेट्टी व तावडे यांनी सहभागी होऊन सर्व कार्यकर्त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर हे दोघेही सर्व कार्यकर्त्यांसह सुनील राणे यांच्या प्रचार मोहिमेतही सहभागी झाले. 

सुनील राणे हे बाहेरचे उमेदवार आहेत, असा प्रचार केला जात होता. मात्र आपली कर्मभूमी उत्तर मुंबई हीच आहे, आपण पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून भाजपचे गेले किमान वीस वर्षे काम करीत आहोत, हे राणे यांनी कार्यकर्त्यांना दाखवून देऊन त्यांची समजूत काढली.

कार्यकर्त्यांचे मन आपण समजू शकतो, आपण कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करू, असा विश्वासही त्यांनी दिला.

दरम्यान स्थानिक भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र सर्वांची जाहीर दिलजमाई झाल्यामुळे त्यांनी तो मागे घेतला. त्यामुळे आता बोरिवली मधील भाजपचा वाडा चिरेबंदी राहील, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

राम नाईक, गोपाळ शेट्टी आदी मान्यवरांनी बोरीवली विधानसभा मतदारसंघाचे समर्थपणे प्रतिनिधित्व केले होते. त्यांची परंपरा आपण तशाच ताकदीने पुढे चालवू.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंत्री होण्यापूर्वीपासून शिक्षण क्षेत्रात जे कार्य केले होते, तोच वारसा आपण आपणही पुढे नेऊ, असा विश्वासही राणे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात तसेच नाका सभांमध्ये व चौक सभांमध्ये बोलताना व्यक्त केला. सर्व कार्यकर्ते आपल्यामागे एकजुटीने उभे असल्यामुळे आपण मोठ्या मताधिक्‍याने निवडून येऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्त्यांची नाराजी तसेच बंडखोरी शेवटपर्यंत कायम राहिली तर ही लढत चुरशीची होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यातच काँग्रेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता आणि सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन कोथरुड पॅटर्न प्रमाणे सुनील राणे यांच्याविरोधात एकाच उमेदवाराला बळ दिले असते तर भाजपला येथे थोडी धावपळ करावी लागली असती. 

मात्र आता दिलजमाईमुळे भाजपची अवस्था सुधारल्याचे दिसून येत आहे. त्यातच शिवा शेट्टी यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने आता राणे यांच्यासमोर फारसे कोणी तगडे स्पर्धक उरले नसल्याचे दिसून येत आहे.

विनोद तावडे यांनी उमेदवारी न मिळाल्यानंतरही शिस्तबद्ध कार्यकर्त्याप्रमाणे पक्षासाठी काम करण्याची हमी दिली होती. ते शब्द त्यांनी आता कृतीत आणल्याने कार्यकर्ते समाधान व्यक्त करीत आहेत.

मागील निवडणुकीत बोरिवलीमध्ये तावडे यांनी एक लाख आठ हजार मते मिळवताना शिवसेना उमेदवाराचा सुमारे ऐंशी हजार मतांनी दणदणीत पराभव केला होता. आता शिवसेना युतीमध्ये असल्याने त्यांची सुमारे तीस हजार मते राणे यांना मिळू शकतात. त्यावेळी मनसे उमेदवाराला एकवीस हजार तर काँग्रेसला पंधरा हजार मते मिळाली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख