पक्ष नेहमीच मोठा मानला, शेवटच्या आठ तासात मिळाली होती उमेदवारी...

" दोनदा आमदार राहिलेल्या वडिलांच्या निवडणूक प्रचारसभेत खुर्च्या मांडणे, कार्यकर्त्यांच्या खांद्यावर चढून पोस्टर चिकटवणे आदी कामे केली. नंतर दोन वेळा मला पराभव पत्करावा लागला, तरी जिद्दीने समाजकार्य सुरुच ठेवले. यावर्षीही आधी उमेदवारी मिळणार नाही असे चित्र होते, पण शेवटच्या आठ तासात नशिबाने 360 अंशात वळण घेतले व उमेदवारी मिळाली. चिकाटीने केलेले समाजकार्य, पक्षनिष्ठा, परिश्रम, वडिलांची पुण्याई यामुळे अखेर कर्मानेच विजयश्री मला सोपवली' भाजपचे बोरिवली येथून निवडून आलेले आमदार सुनील राणे सांगत आहेत आपला आजपर्यंतचा प्रवास...
 पक्ष नेहमीच मोठा मानला, शेवटच्या आठ तासात मिळाली होती उमेदवारी...

वडील दत्तात्रय राणे हे 1995 मधील सेना-भाजप युती सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षणमंत्री होते. ते संघाचे स्वयंसेवक आणि गिरणी कामगार होते. गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी ते नेहमीच लढा देत असल्याने त्यातूनच मला लहानपणीच समाजकारणाची आवड निर्माण झाली. काका पांडुरंग राणे हे शिवसेनेचे शाखाप्रमुख, गिरणीकामगार सेनेच्या संस्थापकांपैकी एक. वडील भारतीय मजदूर संघाचे काम करीत असत, त्यांनी आचार्य अत्रेंविरोधात जनसंघामार्फत निवडणुका लढविल्या होत्या. घरात असे जहाल-मवाळ वातावरण असूनही संयमाने या दोघांची सांगड कशी घालावी हे मी वडिलांकडूनच शिकलो. तरुणपणी एकीकडे भाजयुमो चा राज्य उपाध्यक्ष असताना एअर इंडियातील नोकरीत शिवसेनाप्रणित स्थानिय लोकाधिकार समितीला साह्य करताना मला याचा फायदा झाला. 

वडील 1990 व 1995 असे दोनवेळा आमदार झाले. त्यांच्या निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय करणे, त्यांना प्रचारसाहित्य देणे, खळ तयार करून कार्यकर्त्यांच्या खांद्यावर चढून पोस्टर चिकटवणे, झेंडे ठोकणे, अगदी एक हजार ते पाच हजार रुपये देणाऱ्या देणगीदारांकडून धनादेश आणणे अशी कामे मी केली. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर मी, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे असे आम्ही राज्य भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होतो. वडील मंत्री झाल्याने लोकांची व कार्यकर्त्यांची कामे घेऊन मी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडेही जात होतो. त्यांनी मला पूर्णवेळ पक्षाचे काम करण्यास सांगितले, काम करण्यात आनंद मिळाला तर नोकरी सोड असाही सल्ला त्यांनी दिला व तो मी मानला. त्यांची कामाची पद्धत, संघर्ष करण्याची वृत्ती यातूनही मी बरेच काही शिकलो. 

एअर इंडियाच्या नोकरीचा सन 2000 मध्ये राजीनामा देऊन पूर्णवेळ राजकारणात प्रवेश केला. 1997 ते 2000 पर्यंत महाराष्ट्र भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष, सन 2003 पर्यंत पक्षाचा मुंबई दक्षिण मध्य जिल्हा सरचिटणीस, 2006 पर्यंत त्याच विभागाचा अध्यक्ष व त्यानंतर आजपर्यंत पक्षाचा मुंबई सरचिटणीस अशा पदांवर काम केले. 2004 मध्ये मी शिवडीतून पराभूत झालो तरी पक्षाची मते वाढवली होती. 2014 मध्ये सेनेबरोबरची युती तुटल्यावर अचानक वरळीतून उमेदवारी मिळाली. तेव्हाही मी 31 हजार मते घेऊन राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांची मते कमी केली व शिवसेनेचा विजय सुकर केला. निवडणुका लढवताना हरलो तरी पक्षाचा आपल्यावर विश्वास आहे हे ठाऊक असल्याने चिकाटीने काम करीत राहिलो. 

आमदारपदाची संधी आताच मिळाली असली तरी समाजकार्य आधीपासूनच सुरु होते. 2015 ते 2019 या काळात मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तपदावर काम करताना ट्रस्ट चे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच तेथील कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुष्कळ धडपड केली. बीडीडी चाळीचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठीही भरपूर प्रयत्न केले. डोंगरी, माटुंगा व मानखुर्द येथील चिल्ड्रेन्स होम मधील सोयी सुविधांमध्येही वाढ करून दिली. अथर्व फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला व बालकांचे शिक्षण, शहीद सैनिकांच्या कुटुंबांना साह्य, आरोग्यसेवा, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण, पर्यावरणाची जपणूक यासाठी बरेच काम केले. 
आमचे काम वरळी-शिवडीतून होते आणि मी विजयी झालो दुसऱ्या टोकाच्या बोरीवलीतून. हा नियतीचा कौल होता. समाजाला अभिप्रेत असे काम करीत राहिलो तर ते काम निश्‍चितपणे तुम्हाला भाग्याकडे नेते. 2019 ला उमेदवारी नाही हे मान्य करीत आपण नसलो तरी पक्ष मोठा झालाच पाहिजे, पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी झाले पाहिजेत यासाठी धडपडायचे ठरवलेच होते. पक्षाने मला काय दिलं म्हणण्यापेक्षा पक्षाने मला खूप दिलं, अशीच माझी भावना होती. वडिलांना पक्षाने अनेकदा दिलेली उमेदवारी, दोनदा आमदारकी, मंत्रीपद, मलाही दोनदा मुंबईतून मिळालेली उमेदवारी, पंधरा वर्षे मुंबई सरचिटणीसपद. यापेक्षा पक्ष किती आणि काय देणार, त्यामुळे आता त्याबदल्यात प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणे हेच माझे कर्तव्य असे मी मानले. 

वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंकडे जाणार व आपल्याला कोठूनही उमेदवारी मिळणार नाही हे निश्‍चित असतानाही मी धीराने आपले काम करीत राहिलो. वडिलांकडून शिकलेला संयम यावेळी कामी आला. ज्या कार्यकर्त्यांना तिकिटे मिळाली त्यांना दूरध्वनी करून त्यांच्या प्रचाराची रणनीती आखत राहिलो, व अखेर चिकाटी-संयमाचे फळ मिळालेच. शेवटच्या दिवशी सकाळी जणु काही भाग्यच मला शोधत आले. अगदी 360 अंशात नशिबाने यू टर्न घेतला व शेवटच्या आठ तासांत उमेदवारी मिळाली. वेळ अपुरा होता तरी ज्येष्ठांचे आशिर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे बोरीवलीत मी नवीन असूनही मुंबईत सर्वात जास्त म्हणजे सुमार 95 हजारांच्या मताधिक्‍याने विजयी झालो. हा माझ्या आतापर्यंतच्या पक्षनिष्ठेचा व संघर्षाचा भाग आहे. 
(शब्दांकन - कृष्ण जोशी) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com