सुलभा खोडके अमरावतीतून लढणार

मोर्शी व धामणगाव रेल्वे मतदारसंघातून एकही इच्छूक समोर आला नाही.
सुलभा खोडके अमरावतीतून लढणार

अमरावती : विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे. अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके, तर तिवस्यामधून भारत शरद तसरे व जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे, महिला आघाडीच्या संगीता ठाकरे यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. मोर्शी व धामणगावमध्ये अद्याप उमेदवार समोर आले नसून उर्वरित सहा मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती उद्या घेण्यात येणार आहेत. 

लोकसभेच्या निवडणुका कॉंग्रेससोबत आघाडीने लढविणाऱ्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार शोधण्याची मोहीम प्रारंभ केली आहे. याच महिन्याच्या प्रारंभी पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. त्यानुसार आठही मतदारसंघातून उमेदवारांची अपेक्षा होती. मात्र मोर्शी व धामणगाव रेल्वे मतदारसंघातून एकही इच्छूक समोर आला नाही. अमरावती, तिवसा, दर्यापूर, अचलपूर, मेळघाट व बडनेरा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक समोर आलेत. 

पक्षाच्या माजी आमदार सुलभा खोडके यांनी मतदारसंघ बदलवून बडनेरा ऐवजी अमरावतीला पसंती दिली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे व विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे यांचे पुत्र भारत तसरे यांनी तिवस्यातून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा तथा प्रदेश सरचिटणीस सुरेखा ठाकरे व जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. 

बडनेरा मतदारसंघातून विनेश आडतीया व प्रमोद इंगळे, अमरावतीमधून माजी आमदार सुलभा खोडके यांच्यासह मेराज खान पठाण, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष सुनील वासनकर, गणेश खारकर, तिवस्यातून भारत तसरे, अरूणा गणेश खारकर, बाबूराव बेलसरे, दर्यापूर मतदारसंघातून इंदू रामचंद्र सोमनाथ, मेळघाट मतदारसंघातून तालुकाध्यक्ष श्रीराम पटेल व अचलपूर मतदारसंघातून हेमंत देशमुख, संगीता ठाकरे, आबीद हुसेन अ. रफीक, प्रदेश सरचिटणीस सुरेखा ठाकरे यांनी उमेदवारी मागितली आहे. 

पक्षाकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छूकांच्या मुलाखती उद्या घेण्यात येणार आहेत. माजी प्रदेशाध्यक्ष व अमरावतीचे प्रभारी अरुण गुजराथी व माजी मंत्री अनिल देशमुख मुलाखती घेणार असून दुपारी 1 वाजता वऱ्हाडे मंगल कार्यालय येथे मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com