सुजय यांनी घाई केली....नगरमध्ये संग्रामच निवडून येणार : सत्यजीत तांबे - SUJAY VIKHE WAS IN HURRY : TAMBE | Politics Marathi News - Sarkarnama

सुजय यांनी घाई केली....नगरमध्ये संग्रामच निवडून येणार : सत्यजीत तांबे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 18 एप्रिल 2019

पुणे : लोकसभा निवडणूक लढविण्याची डॉ. सुजय विखे-पाटील यांनी घाई केली. मी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. एका निवडणुकीत ते थांबले असते तर फार मोठे नुकसान झाले नसते. आम्ही दोघे नगर जिल्ह्यातील आहोत. त्यामुळे शिर्डीच्या साईबाबांप्रमाणे श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला मी त्यांना दिला होता. मात्र, त्यांनी तो ऐकला नाही, असे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज सांगितले. 

पुणे : लोकसभा निवडणूक लढविण्याची डॉ. सुजय विखे-पाटील यांनी घाई केली. मी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. एका निवडणुकीत ते थांबले असते तर फार मोठे नुकसान झाले नसते. आम्ही दोघे नगर जिल्ह्यातील आहोत. त्यामुळे शिर्डीच्या साईबाबांप्रमाणे श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला मी त्यांना दिला होता. मात्र, त्यांनी तो ऐकला नाही, असे युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आज सांगितले. 

या निवडणुकीत डॉ. सुजय निवडून येण्याची शक्‍यता नाही. नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा कॉंग्रेस आघाडी जिंकणार आहे. दोन्ही ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांना चांगले वातावरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. "सरकारनामा फेसबुक लाईव्ह'मध्ये बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुका, पक्षाचे संघटन याबाबत चर्चा केली.

ते म्हणाले, "" नगरची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असल्याने आमचा नाईलाज झाला. जर ही जागा कॉंग्रेसकडे असती तर डॉ सुजय हेच एकमेव उमेदवार होते. त्यांना पर्याय नव्हता. तरीही त्यांच्यासाठी आम्ही राहूल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.'' 

सुजय यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील हे आता भाजपचेच खुलेपणाने काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर काॅंग्रेसमधील नेते टीका करीत आहेत. आता विखे यांनीच आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, असा सल्ला सत्यजीत यांनी दिला.

नेत्यांची मुले पळविणाऱ्या टोळीपासून मी वाचलो. कारण माझी काॅंग्रेसवर निष्ठा आहे. हे भाजपच्या नेत्यांना माहिती आहे. राजकारणात मी सबुरीने चालण्याचे ठरविले असल्याने मला घाई नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

राज्यभर फिरल्यानंतर परिस्थिती बदलल्याचा अंदाज येतोय. राज्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागतील. नागपूरमध्ये धक्कादायक निकाल लागून नाना पटोले निश्‍चितपणे निवडून येतील. पुण्यातदेखील कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल. गेल्या काही वर्षात काहीजणांनी कॉंग्रेस सोडली असली तरी कॉंग्रेसलाच चांगले भविष्य आहे, असा विश्‍वास तांबे यांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता हा महत्वाचा मुद्दा होता. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी देण्याचे पक्षाचा धोरण आहे. या पुढील काळात त्या दृष्टीने युवक संघटनेचे काम अधिक जोमाने करण्याचे नियोजन आहे. युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आल्यानंतर गेल्या पाच महिन्यांत राज्यभर व्यापक दौरा करून संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातून युवकांचा मोठा पाठिंबा संघटनेला मिळत आहे, असे तांबे यांनी सांगितले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख