sujay vikhe about shirdi sansthan | Sarkarnama

काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाबद्दल माफ करणार नाही: सुजय विखे

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 नोव्हेंबर 2018

काँग्रेसच्या कोर्टात हा चेंडू गेल्यानंतर शांत बसतील ते विखे पाटील कसले?

नगर : शिर्डी साई संस्थानचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला व विदर्भाला देण्यावरून संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे व काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांत झालेल्या वादाला राजकीय वळण मिळत आहे. आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही माफ करणार नाही, असा इशारा काँग्रेसचे युवा नेते सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.

साई संस्थानचा निधी आधी भाविकांच्या सुविधांसाठी खर्च करावा, नंतर शासन किंवा इतर जिल्ह्यात द्यावा, अशी काही सामाजिक कार्यकर्त्यांची वर्षानुवर्षांची मागणी आहे. हावरे यांनी विदर्भासाठी पन्नास कोटी निधी दिला. मुख्यमंत्री निधीसाठीही पन्नास कोटी देणार आहेत. अर्थात हा निर्णय एकट्या हावरे यांचा नसून सर्व संचालक मंडळाचा आहे. हे देवस्थानच मुळी शासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे बहुतेक निर्णय शासनच ठरविते. असे असतानाही काही लोकांनी हावरे यांना जाब विचारत त्यांच्या गाडीची मोडतोड केली. हावरे यांनीही आपली भूमिका मांडताना काँग्रेसच्या काही लोकांनी हा प्रकार केल्याचे सांगून नवीन दुखणे अंगावर ओढून घेतले.

काँग्रेसच्या कोर्टात हा चेंडू गेल्यानंतर शांत बसतील ते विखे पाटील कसले? साई संस्थानवर वर्षानुवर्षे विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. त्यांना संस्थानचा खडा न खडा माहित आहे. अशा परिस्थितीत हावरे यांनी केलेला आरोप विखे पाटील कुटुंबाला नक्कीच जिव्हारी लागला. सुजय विखे यांनी साई संस्थानच्या विरोधात आता आंदोलनाची भूमिका घेतली आहे. भाजप सरकार सत्तेचा वापर करून मंदिर, ट्रस्ट, स्थानिक स्वराज्या संस्थेत त्यांचे लोक बसवून मनमानी करीत आहेत. यापुढे अशी मनमानी सहन केली जाणार नाही अन्यथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करू, असा इशारा विखे यांनी दिला आहे. विखे यांनी भाजपवर टीका करून या विषयाला राजकीय वळण दिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख