sudhanwa gondhalekar arrset | Sarkarnama

बॉंब साठ्याप्रकरणी सुधन्वा गोंधळेकरला अटक झाल्याने साताऱ्यात खळबळ 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

नालासोपारा येथील बॉंबच्या साठ्याप्रकरणी "एटीएस'ने मूळचा करंजे पेठेत राहणाऱ्या सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्याने शहरात खळबळ उडाली. गोंधळेकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व इतर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिस देत आहेत. त्याच्या संपर्कात असणाऱ्यांवर नजर ठेवून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

सातारा : नालासोपारा येथील बॉंबच्या साठ्याप्रकरणी "एटीएस'ने मूळचा करंजे पेठेत राहणाऱ्या सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्याने शहरात खळबळ उडाली. गोंधळेकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व इतर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती पोलिस देत आहेत. त्याच्या संपर्कात असणाऱ्यांवर नजर ठेवून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

सुशिक्षित घरातील गोंधळेकरचे दहावीपर्यंतचे शिक्षण राजवाडा परिसरातील एका शाळेत, तर महाविद्यालयीन शिक्षणही साताऱ्यातच झाले. परिसरातून मिळालेल्या माहितीनुसार, शालेय जीवनात तो हुशार होता. घरातील वातावरणामुळे तो हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. कडवा व आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती. 

करंजे पेठेत त्याने शिवप्रतिष्ठानसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यक्रम घेतले होते. प्रतापगड परिसरातील अफजलखान कबरीच्या अनुषंगाने झालेले आंदोलन, सांगली येथे झालेल्या जातीय दंगलीनंतर साताऱ्यात निर्माण झालेल्या दंगलसदृश्‍य परिस्थितीत तो आक्रमकपणे सहभागी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याच काळात तो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये सामील झाल्याची माहिती समोर येत आहे. दुर्गा दौडसह गडकोट मोहिमेच्या आखणीत तो पुढे दिसल्यामुळे पोलिसांचे त्याच्यावर लक्ष होते. धार्मिक सणांच्या वेळी शाहूपुरी, तसेच शहर पोलिसांकडून त्याला अनेकदा नोटीससुद्धा बजावण्यात येत होत्या. 

महाविद्यालयीन शिक्षणानंतर तो पुण्याला गेला. दीड वर्षापासून तो पुण्यातच होता. तेव्हापासून त्याचा साताऱ्याशी संपर्क कमी झाला. बीई पदवी घेतल्यानंतर त्याने बांधकामाशी निगडित व्यवसाय पुणे व सातारा येथे सुरू केला होता. त्यामध्ये त्याने अनेक युवकांना नोकरी दिली. तो अधूनमधून साताऱ्याला यायचा, असेही परिसरातील नागरिक सांगत आहेत. दरम्यान, गोंधळेकरचा बॉंबच्या प्रकरणात अटक झाल्याचे समजल्यानंतर साताऱ्यातील त्याच्याशी संपर्कात असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. त्याच्याशी सबंधित कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचीही चौकशी होण्याची शक्‍यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख