करमाळ्याच्या `वैभव`चे सर्वांनाच नवल... एसटी काॅलनीत जोरदार गुलाल उधळला.. - success of vaibhav navale in mpsc examination celebrated in karmala | Politics Marathi News - Sarkarnama

करमाळ्याच्या `वैभव`चे सर्वांनाच नवल... एसटी काॅलनीत जोरदार गुलाल उधळला..

विश्वभूषण लिमये
बुधवार, 18 मार्च 2020

.....

करमाळा : अपयशाने खचून न जाता प्रयत्न केल्यावर यश कसं पायाशी लोटांगण घालतं, याचं उदाहरण सोलापूर जिल्ह्यातून समोर आले आहे. करमाळा शहरात राहणाऱ्या वैभव नवले याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) तर्फे घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर करमाळ्यातील वैभव अशोक नवले याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.  वैभवला पहिल्या प्रयत्नात केवळ एका गुणाने अपयश आले होते पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने उज्ज्वल यश संपादन केले आहे.

वैभवचे वडील अशोक नवले करमाळा एसटी आगारातून क्लार्क म्हणून सेवानिवृत्त झालेले असून आई अलका ही गृहिणी आहे घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. वैभवला दोन बहिणी असून त्या विवाहित आहेत. नवले कुटुंबीय मूळचे करमाळा तालुक्यातील कंदर येथील आहेत. सध्या ते करमाळ्यातील श्री देवीचा माळ हद्दीतील एसटी कॉलनीत वास्तव्यास आहेत. वैभवचे प्राथमिक शिक्षण करमाळा नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा नंबर 3 मध्ये तर दहावीपर्यंत शिक्षण महात्मा गांधी विद्यालय आणि बी ए पदवीपर्यंतचे शिक्षण करमाळयातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झाले आहे.

वैभवने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा सर्वप्रथम 2016 मध्ये दिली होती. पण त्यावेळी एका गुणाने संधी हुकली होती. तरीही त्याने जिद्द व चिकाटीच्या बळावर पुन्हा 2018 मध्ये परीक्षा दिली. त्या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्यामध्ये वैभवला 340 गुणापैकी 267 गुण मिळाले व तो राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. हे वृत्त करमाळयात कळताच कळताच एस.टी. कॉलनीत त्याच्या घरासमोर मित्रांनी नातेवाईकांनी गुलालाची उधळण करून पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख