Success Story of Sangitra Dhaygude | Sarkarnama

दिवंगत पतीच्या डायरीतील काव्यातून प्रेरणा घेऊन सातारची वाघीण संगीता धायगुडे झाल्या राजपत्रित अधिकारी 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

साताऱ्याचा माण तालुका आणि दुष्काळ हे एक समीकरणच आहे. या दुष्काळामुळे परिस्थितीशी दोन हात करण्याच बाळकडू येथील प्रत्येकाला बालपणीच मिळते. त्यामुळे अगदी जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन ही माणसं हमखास यशस्वी असतात. यात आता एका नावाची भर पडली आहे. मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे. 

मालेगाव : लहान वयात संसाराची जबाबदारी आली. त्यात पतीचे निधन झाले. मुले, संसार अन्‌ आयुष्याचे आव्हान त्रस्त करु लागले. आत्महत्येचा विचार मनात डोकावुन गेला. मात्र, पतीच्या डायरीतील एक काव्य प्रेरणादायी ठरले. त्यांनी जिद्दीने पाऊल टाकले. राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली. अन्‌ त्या राजपत्रित अधिकारी बनल्या. सध्या त्या मालेगाव महापालिकेच्या आयुक्त म्हणुन कार्यरत आहेत. या जिद्दी अधिकारी महिलेच नाव आहे संगीता धायगुडे. 

साताऱ्याचा माण तालुका आणि दुष्काळ हे एक समीकरणच आहे. या दुष्काळामुळे परिस्थितीशी दोन हात करण्याच बाळकडू येथील प्रत्येकाला बालपणीच मिळते. त्यामुळे अगदी जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन ही माणसं हमखास यशस्वी असतात. यात आता एका नावाची भर पडली आहे. मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे. 

आंधळी (ता. माण) येथील बापूराव काळे यांची त्या कन्या. त्यांच्याकडे शंभर एकर शेती. घरी पाटीलकी. गावातील चार खोल्यांच्या जीवन विद्यामंदीरात मात्र मंदिरात भरणाऱ्या वर्गात त्यांचे शिक्षण झाले. हुशार असल्याने त्यांनी पहिली व दुसरीची परिक्षा एकाच वेळी दिली. अगदी चौरचोघींसारखेच त्यांचे बालपण गेले. 1971 मध्ये दहावीचे शिक्षण सुरु असतांनाच पोलीस दलातील अधिकारी उत्तम धायगुडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या संसारात रमल्या. निखिल आणि हर्षल दोन मुले झाली. त्यांच्या संगोपनात त्या गुंतल्या.

मात्र, पतीच्या प्रोत्साहनाने वीस वर्षांच्या खंडानंतर त्यांनी बारावीची परीक्षा दिली. 1996 मध्ये मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठातुन बी. ए. ची पदवी प्राप्त केली. याच सुमारास त्यांच्या आयुष्याने कुस बदलली. नव्या संकटांचे आगमन झाले. पतीची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. मुले, संसार अन्‌ आयुष्याचे आव्हान पेलण्याची जबाबदारी एकटीवर येऊन पडली. पतीच्या जागेवर नोकरीत नियुक्ती व्हावी यासाठी खुप धडपड करावी लागली. 

पतीच्या निधनानंतर सरकारी सोपस्कार करण्यासाठी सरकारी लालफितीचा अनुभव त्यांच्याही गाठीशी आला. अनेकदा मंत्रालयात चकरा माराव्या लागल्या. आपल्या आत्मकथनात त्याचा उल्लेख आहे. तो असा.........ते दिवस आठवून आजही अंगावर काटा येतो. उदास पोकळीनं भरलेले ते दिवस, समाजाचा निष्ठूरपणा, नातेवाईकांचं नजरा वळवणं आणि मंत्रालयाच्या प्रत्येक कामामागे झटावं लागणं. काय नव्हतं त्या दिवसांत? दुःख, अपमान, अभाव, दुबळेपणा, समाजाशी टक्कर देऊन अस्तित्व सिद्ध करणं....

यावेळी परिचीत, नीकटच्यांनी पाठ फिरवली. निराशेने ग्रासले. आत्महत्येचा विचार मनात घोळत असे. यावेळी पतीची डायरी त्यांच्या हाती पडली. त्यातील काव्य पक्तींनी जगण्याची नवी उभारी मिळाली. त्या पंक्ती अशा....

जमाना हंसे एैसी भूल ना करना, 
ये है बुजदिल तेरा बेमोंत मरना, 
ये मत भूल तू माँ भी है और पिता भी, 
तेरे साथ मासूम दो जिंदगी भी, 
तेरे इबादद उसका क्‍या होगा, 
कहाँ उनको जग में सहारा मिलेंगा, 
उन्ही के लिए मुस्कराते हुए जिए जा, 
बुराई के बदले भलाई किए जा । 

या ओळींनी त्यांना प्रेरणा दिली. संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी त्यांनी आत्मविश्‍वासाने राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याची तयारी सुरु केली. खुप मेहनत घेतली. अभ्यास केला. 1997 मध्ये त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी सुरु केली. त्यासाठी अक्षरशः रात्रीचा दिवस केला. त्यात त्यांच्या मुलांनीही त्यांना मदत केली. घरातील कामे मुले करीत. अगदी स्वयंपाकही करीत. 1999 राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चार लाख विद्यार्थ्यांतुन त्या उत्तीर्ण झाल्या. राजपत्रित अधिकारी म्हणुन त्यांची नियुक्ती झाली. जीवनाचा एक नवा अध्याय सुरु झाला. 

त्यांची पहिली नियुक्ती अलिबागला जिल्हा प्रकल्प अधिकारी पदावर झाली. ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त, नगरपरिषद संचलनालयात सहाय्यक संचालक, खेड नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, उल्हासनगर आणि वसई विरार महापालिकेत उपायुक्त, नगरपरिषद प्रशासन प्रादेशिक उपसंचालक, धुळे महापालिकेच्या आयुक्त म्हणुन काम केले आहे. सध्या त्या मालेगाव महापालिकेच्या आयुक्त म्हणुन कार्यरत आहेत. येथे त्यांनी अनेक नाविण्यपुर्ण कामे केली. 2006 मध्ये राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीतुन त्या जर्मनी येथे एक वर्षाचा 'सस्टेनेबल सिटी प्रोग्रॅम' हे प्रशिक्षण पुर्ण केले. विविध आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी सहभाग घेतला आहे. 

आपला सबंध जीवनप्रवास त्यांनी 'हुमान' या आत्मकथनात केला आहे. 25 डिसेंबर, 2014 ला त्याचे प्रकाशन झाले. अवघ्या वीस दिवसांत ही आवृत्ती संपली. आजवर त्याच्या आठ आवृत्ती निघाल्यात. या आत्मकथनास पुणे साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, पंढरपुरचा डॉ. द. ता. भोसले आणि मुंबई मराठी ग्रंथालयाच्या पुरस्कारासह सहा पुरस्कार मिळाले. या पुस्तकावर विद्यार्थ्यांनी एम. फील केले आहे. पीएच. डी. चे संशोधन सुरु आहे. अंधासाठी टॉकींग बुक सीडी उपलब्ध झाली आहे. 'नियती साथे संघर्ष' हे त्याचे गुजराती भाषांतर प्रकाशीत झाले आहे. विविध लेखांचा संग्रह असलेले "लक्ष्य वेध' हा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. 

श्रीमती धायगुडे यांना आजवर महिला जीवनगौरव, पुण्याच्या संस्थेने अहिल्यादेवी, नागरी सेवा पुरस्कार, अहिल्यादेवी जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तेजस्विनी पुरस्कार, नवरत्न आई, लायन्स क्‍लबचा राष्ट्रीय पुरस्कार तसेच जिल्हा पुरस्कार, राजमाता अहिल्यादेवी, मुख्यमंत्र्यांच्या प्रशस्तीपत्रकासह अठराहून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख