निवडणूक येताच सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी चालवली सायकल ! - Subhash Deshmukh takes a ride on bicycle | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणूक येताच सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी चालवली सायकल !

परशुराम कोकणे
शनिवार, 15 जून 2019

शनिवारी सकाळच्या सुमारास होटगी रस्त्यावरील निवासस्थानातून सहकार मंत्री देशमुख सायकल घेवून बाहेर पडले. रोजच्या सारखाच पांढऱ्या रंगांचा पोषाख त्यांनी केला होता. सायकलिंग करत पाचच मिनिटात सहकारमंत्री आसरा चौक मार्गे हॉटेल बालाजी सरोवरमध्ये पोचले.

सोलापूर  : विधानसभा निवडणुका जवळ आल्या सल्याने राजकीय नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवित आहेत . राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख  यांनी मतदारांना प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी चक्क सायकल चालवली . मंत्री महोदयांचा  सायकल प्रवास करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. सहकार मंत्र्यांच्या व्हिडीओवरून सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

 

आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास होटगी रस्त्यावरील निवासस्थानातून सहकार मंत्री देशमुख सायकल घेवून बाहेर पडले. रोजच्या सारखाच पांढऱ्या रंगांचा पोषाख त्यांनी केला होता. सायकलिंग करत पाचच मिनिटात सहकारमंत्री आसरा चौक मार्गे हॉटेल बालाजी सरोवरमध्ये पोचले. सायकलिंग करताना रस्त्यावरील लोक देशमुख यांना आश्‍चर्याने पाहत होते. देशमुख यांच्या सायकलमागे पांढऱ्या रंगाची कार आणि सोबत वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची जीपही दिसत आहे. सायकलच्या पुढे दुचाकीवरील पोलिस कर्मचारी आपली ड्युटी बजावताना दिसून येत आहेत. 

हा व्हिडीओ सहकार मंत्री देशमुख यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडीयावर शेअर केला आहे. देशमुख यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरही हा व्हिडीओ शेअर केला आहे. काही वेळातच अनेक व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर आणि फेसबुकवर हा शेअर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, हॉटेल बालाजी सरोवरमधील उद्योजकांचे कार्यक्रम संपल्यानंतर सहकारी मंत्री देशमुख हे नेहमीप्रमाणे आपल्या वाहनांच्या ताफ्यातून उस्मानाबादकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख