सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात हवीच : विद्यार्थी संघटनांची मागणी

सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात हवीच : विद्यार्थी संघटनांची मागणी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून "शनिवारवाडा' हटविण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. शनिवारवाडा आणि शिक्षण याचा काही संबंध नसतानाही विद्यापाठीच्या बोधचिन्हामध्ये तो कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा असणाऱ्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण यावेळी करण्यात आले. 

पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे यासाठी प्रदीर्घ संघर्ष केल्यानंतर 2014 मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार झाला. परंतु 1950 मध्ये माधव दीक्षित यांनी पुणे विद्यापीठाचे बनविलेले बोधचिन्ह "कमळाच्या आकारात शनिवारवाडा' असेच आजतागायत राहिले आहे. ते बदलण्यात येऊन शनिवारवाड्याच्या ऐवजी बोधचिन्हात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचा समावेश करावा, अशी मागणी सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन, मुक्तवादी संघटना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, छात्र भारती, कलासंगिनी, मुक्ती संघर्ष समिती, दलित आदिवासी अधिकार आंदोलन, नैर्ऋत्य समाजविज्ञान अकादमी, नैर्ऋत्य गणसंघ या संघटनांनी केली आहे. 


शनिवारवाडा पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हात का नको? शनिवारवाडा हा शुद्रातिशुद्रांच्या, बहुजनांच्या आणि महिलांच्या गुलामगिरीचे प्रतीक असून शिक्षणाशी त्याचा काही संबंध नाही. महिलांच्या शिक्षणासाठी झगडणाऱ्या सावित्रीबाईंचे नाव विद्यापीठाला असून महिलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे काम ज्या ठिकाणावरून झाले त्या शनिवारवाड्याचा समावेश विद्यापीठाच्या बोधचिन्हात असणे हा मोठा विरोधाभास आहे. शनिवारवाडा हा गुलामगिरीचे प्रतीक असून आम्ही विद्येचे प्रतीक म्हणून त्याचा स्वीकार करू शकत नाहीत. विद्यापीठाला सत्यशोधक समतेच्या पाईक सावित्रीबाई फुले यांचे नाव असताना बोधचिन्ह विषमतेचे पाईक असणाऱ्या पेशव्यांच्या शनिवारवाड्याचे का? असा प्रश्‍न कलासंगिनीच्या राज्य संघटक शीतल साठे यांनी उपस्थित केला. 

नव्या बोधचिन्हाचे अनावरण 

भिडेवाडा, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि पुस्तकावर विद्येचा दिवा असलेल्या नव्या बोधचिन्हाचे विद्यार्थी संघटनांनी सोमवारी अनावरणही केले. विद्यापीठाचे सध्याचे बोधचिन्ह हटवून त्या जागी हे नवे बोधचिन्ह स्वीकारण्यात यावे, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com