story on late vimal mundada | Sarkarnama

'ओन्ली विमल' ही ओळख त्यांनी आपल्या बेधडक संघर्षातून तयार केली! 

प्रशांत बर्दापूरकर 
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

उच्चशिक्षीत असलेल्या दिवंगत डॉ विमलताई मुंदडा कुठलाही निर्णय बेधडक घेत. अनुसूचित जाती मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्या तरी त्या राजकीय दृष्ट्या कधी वाकल्या नाहीत. निर्णयात माघार न घेणाऱ्या दिवंगत विमलताई मुंदडा यांना राजकीय संघर्ष देखील करावा लागला. मात्र, वैयक्तिक पातळीवर त्या मायाळू होत्या. प्रत्येकाची विचारपूस आणि जवळ घेत आस्थेवाईकपणे चौकशी करून कामही करत. त्यामुळे त्यांच्यापासून कोणी दुरावत नसे. 

अंबाजोगाई (बीड) : कुठलाही राजकीय वारसा नसताना बीड जिल्ह्यात "ओन्ली विमल' अशी ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत नेत्या आणि माजी मंत्री डॉ. विमल मुंदडा यांची आज जयंती आहे. सलग पाचवेळा विजय आणि तोही प्रत्येकवेळी चढत्या मताधिक्‍याने मिळवण्यात त्यांचा संघर्ष महत्त्वाचा आहेच, त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली साथही मोलाची आहे. 

जनतेच्या पाठबळावर एखाद्या मतदारसंघाचे सलग 5 वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मोजक्‍या नेत्यांनाच मिळते. जिल्ह्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर ती कामगिरी आतापर्यंत केवळ दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांना करता आली. 

सामान्य कुटुंबातून आलेल्या विमलताई यांचे वैद्यकीय (एम. बी. बी. एस.) शिक्षण अंबाजोगाईत झाले. येथील व्यापारी नंदकिशोर मुंदडा यांच्याशी विवाहबध्द झाल्यानंतर त्या राजकारणात आल्या. केज मतदारसंघातून त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमधून 1990 साली पहिली निवडणूक लढविली. पहिल्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेल्या दिवंगत विमलताईंचा विजयरथ त्यांच्या अखेरपर्यंत कोणालाही रोखता आला नाही. 

राजकारणात एकदा लोकांची मनं जिंकून त्यांच्या सुख दु:खात सहभागी झाल्यानंतर यश निश्‍चित मिळते असेच त्यांनी दाखवून दिले होते. अंत्यविधी, मुंज, लग्नकार्य अशा सुखदुःखांच्या प्रसंगाला जाण्याचा नवा पायंडाच त्यांनी पडला. पण, हे करताना त्यांच्या विकासाच्या गाडीचा वेगही कधी मंदावला नाही. 1995 च्या निवडणूकीत भाजपकडून दुसऱ्या वेळी विजयी झालेल्या विमलताई मुंदडा यांचे आणि नेतृत्वात अंतर पडले.

राज्यात पाहिल्यावेळी पक्ष सत्तेत असतानाही त्यांनी 1998 मध्ये शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. पुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर त्या राष्ट्रवादीत गेल्या. मतदार संघातील जातीय मतांचा धोका आणि सत्तेतला पक्ष अशी दुहेरी रिस्क त्यांनी घेतली. पण, जनतेशी नाळ पक्की जोडलेली असल्याने त्यांच्या विजयी मतांचा आकडा वाढलेलाच होता. पुढील दोन निवडणूकातही त्यांनी विजय मिळवत केज मतदार संघात "ओन्ली विमल' अशी स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना 9 वर्षे त्या कॅंबिनेट व राज्यमंत्री राहिल्या. प्रथम महिला व बालकल्याण राज्यमंत्री व त्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्री म्हणून काम पाहिले. आपल्या काळात विविध योजनाही त्यांनी राबविल्या. 

राजकारणात संघर्ष व सामाजिक योगदान असल्याशिवाय सर्वसमावेशक नेतृत्व घडू शकत नाही हे वास्तव आहे. दिवंगत विमलताई मुंदडा यांचे नेतृत्वही असेच घडले. अंबाजोगाईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जिल्हा निर्मिती हा होता. त्यासाठी जनता व स्थानिक नेत्यांसोबत विविध आंदोलने त्यांनी केली. परंतु यात यश आले नाही.

मंत्री झाल्यावर मात्र त्यांनी जिल्हा निर्मितीसाठी लागणारी पूरक कार्यालये मात्र येथे आणली. अपर जिल्हाधिकारी, अपर पोलिस अधिक्षक, भूसंपादन विभाग, उपप्रादेशिक परिवहन, ग्रामीण पोलिस ठाणे ही कार्यालये त्यांनी 10 वर्षाच्या कालावधीत येथे सुरू केली. परंतु जिल्हा निर्मितीचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. त्यापूर्वीच आजारामुळे त्यांचे निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी केलेल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ती सतत जनतेच्या मनात राहणार हे मात्र निश्‍चित. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख