Stolen DVR's Kept Back by Thieves is Surprising say Nana Patole | Sarkarnama

चोरलेले डीव्हीआर चोरट्यांनीच परत आणणे हा चमत्कार : नाना पटोले

अतुल मेहेरे
बुधवार, 8 मे 2019

नागपूर जिल्ह्यात 11 एप्रिलला मतदान पार पडले. मतदानाची प्रक्रिया आटोपून जवळपास एक महिन्याचा कालावधी संपत आला. 23 मेला मतमोजणी केली जाणार आहे. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत - नाना पटोले

नागपूर : नागपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर स्ट्रॉंग रूममधील अनेक विधानसभा मतदारसंघांचे सीसीटीव्ही बंद होते. आम्ही आक्षेप घेतला तेव्हा आम्हालाच जिल्हाधिकाऱ्यांनी खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयात गेल्यावर त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेज नसल्याचे मान्य केले. रामटेक लोकसभा मतदारसंघात उमरेड येथील स्ट्रॉंग रूमधील सीसीटीव्ही चोरीला गेल्याची तक्रारीचीसुद्धा सुरुवातीला त्यांनी दखल घेतली नाही. पण आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्यानंतर गुन्हा दाखल केला. आयोगाचे पथक आल्यानंतर चोरीला गेलेले 'डीव्हीआर' (डीजीटल व्हीडीओ रेकॉर्डर) चोरट्यांनी परत आणून ठेवल्याचा चमत्कार नागपूर जिल्ह्यात घडला, असे माजी खासदार तसेच नागपूर लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी सांगितले. याप्रकरणी निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार असल्याचेही ते म्हणाले.

ते म्हणाले, "नागपूर जिल्ह्यात 11 एप्रिलला मतदान पार पडले. मतदानाची प्रक्रिया आटोपून जवळपास एक महिन्याचा कालावधी संपत आला. 23 मेला मतमोजणी केली जाणार आहे. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. नागपूरमध्ये सुमारे आठ हजार 320 कर्मचारी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या चालढकलपणामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. वास्तविक प्रत्यक्ष मतदानापूर्वीच निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत बॅलेट पोहोचणे आवश्‍यक आहे. ती प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी केली नाही. ज्या मतदान केंद्रात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना तेथेच मतदानाची सुविधा (ईडीपी) उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. तीसुद्धा मान्य केली नाही.''

पटोले पुढे म्हणाले, "पोस्टल बॅलेटविषयी विचारणा केली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी अनेकांचे पत्ते चुकीचे असल्याने बॅलेट परत आल्याचे सांगितले. ही शुद्ध थाप आहे. ज्या कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्ती केली जाते तेव्हा त्यांना घरपोच नियुक्तिपत्र पाठविली जातात. निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. आता त्यांचे पत्ते चुकीचे होते म्हणणे खरे वाटत नाही," 

''निवडणुकीवर कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र, नागपूरमध्ये मतदारांपर्यंत ओळखपत्र पोहोचवण्यात प्रशासन अपयशी ठरले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या आसपास बूथ लावून मतदारांना परिचय पत्र वाटप करण्याचा नवाच पायंडा जिल्हाधिकाऱ्यांनी पाडला. त्याकरिता भरउन्हात मतदारांना दोन वेगवेगळ्या रांगांमध्ये उभे राहावे लागले. यामुळे मतदारांना मनःस्ताप सहन करावा लागला. निवडणुकीचा टक्कासुद्धा याच कारणामुळे घटला," असा आरोपही पटोले यांनी केला.

राजकीय घडामोडींच्या बित्तंबातमीसाठी - www.sarkarnama.in
सरकारनामा ट्वीटर - https://twitter.com/MySarkarnama
सरकारनामा फेसबूक - https://www.facebook.com/MySarkarnama/

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख