इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प - State's biggest Solar energy plant at Indapur | Politics Marathi News - Sarkarnama

इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मे 2017

येथील प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेऊन उभारण्यात येत आहे त्यामुळे प्रकल्प उभा करत असताना त्यांना त्रास होऊ नये, याची काळजी संचालकांनी घ्यावी.- विजय शिवतारे

भिगवण - जलविद्युत प्रकल्पाला मर्यादा आहेत. तर कोळशापासून वीजनिमिर्ती करताना प्रदूषण व कच्च्या मालाच्या उपलब्धतेसारख्या समस्या आहेत. राज्याची विजेची वाढती गरज लक्षात घेता सौरउर्जा हा सध्या उत्तम पर्याय आहे. मदनवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यातील सर्वांत मोठा सौरउर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्याच्या यशस्वीतेसाठी कंपनीने शेतकरयांना प्रकल्पामध्ये सहभागी करुन घेतल्यास कंपनी व शेतकरी या दोघांचाही फायदा होईल, असे मत राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.

मदनवाडी (ता. इंदापूर) येथे कॅप्चर सोलर एनर्जी कंपनीच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या 150 मेगावॉट सौर प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. भाजपचे मारुती वणवे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब धुमाळ, मनसेचे अॅड. सुधीर पाटसकर, प्रकाश ढवळे, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, मदनवाडीच्या सरपंच सारिका बंडगर, कॅप्चर सोलर एनर्जीचे चेअरमन राजू भोसले, संचालक राजेंद्र बळीनवर, वासुदेव भोसले उपस्थित होते.

शिवतारे म्हणाले, ''येथील प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या जमिनी भाडे तत्वावर घेऊन उभारण्यात येत आहे त्यामुळे प्रकल्प उभा करत असताना त्यांना त्रास होऊ नये, याची काळजी संचालकांनी घ्यावी.'' आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, ''मदनवाडी येथे सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पामुळे या भागाच्या विकासास मदत होणार आहे. प्रकल्पामुळे 500 स्थानिक तरुणांना रोजगारांच्या संधी मिळणार आहेत. कंपनीच्या उभारणीनंतर मदनवाडीच्या माळरानावर समृध्दी येऊन येथील शेतकर्यांना निश्चित लाभ होईल.''

राजू भोसले म्हणाले, ''प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे  निरसन करण्यात येईल. त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प चालविण्यात येईल. प्रकल्पासाठी 80 टक्के स्थानिकांना रोजगार मिळेल. त्याबरोबर या भागाच्या विकासासाठीही प्रकल्पाच्या माध्यमातून हातभार लावण्याचा प्रयत्न राहील.'' बाळासाहेब धुमाळ, प्रकाश ढवळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

- राज्यातील सर्वांत मोठा सौरउर्जा प्रकल्प.

- 120 मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता.

- एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.

- पाचशे स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख