state government stop the mahaportal work | Sarkarnama

महापोर्टलच्या कामकाजाला स्थगिती, पशुसंवर्धनमधील भरतीची परीक्षा रद्द

उमेश घोंगडे
शनिवार, 7 डिसेंबर 2019

.....

पुणे : राज्यातील तलाठी, ग्रामसेवक या पदांसह वर्ग तीन व चारच्या विविध खात्यातील पदांसाठी परीक्षा घेणाऱ्या महापोर्टलच्या कामाला स्थगिती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केला. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांकडून महापोर्टलबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. मात्र, आधीच्या सरकारने त्याची दखल घेतलेली नव्हती. पशुसंवर्धन विभागातील भरतीसाठी उद्या (रविवारी) घेण्यात येणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. 

ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेत आल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांनी हे पोर्टल बंद करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या भावनांची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील मुख्यमंत्र्यांकडे चार दिवसांपूर्वी ही मागणी केली होती. खासदार सुळे यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने आज हा निर्णय घेतला. मात्र, ज्या परीक्षा झाल्या आहेत आणि निकाल बाकी आहेत त्यांचे काय या बाबत सरकारकडून खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. 

कृषी विभागात कृषी सेवक पदासाठी मार्च 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आली. मात्र, त्याचा निकाल अद्याप आलेला नाही. तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल राज्यातील काही विभागांचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यातील निकाल जाहीर करण्यात आला नाही. निकालाला उशीर का होतोय, याबाबत माहितीदेखील दिली जात नाही. माहितीचा अभाव व पारदर्शकतेबाबत साशंकता हे महापोर्टलबाबतचे प्रमुख आक्षेप आहेत. तलाठीपदाच्या परीक्षेत जालना जिल्ह्यातील एक विद्यार्थी परीक्षेला बसला नव्हता तरीही गुणवत्ता यादीत त्याचे नाव असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानंतर त्या विद्यार्थ्याचा निकाल मागे घेण्यात आला. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख