state government decision | Sarkarnama

फुके गोंदिया, भंडाऱ्याचे, तर बावनकुळे वर्ध्याचे पालकमंत्री

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 जुलै 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल झाल्यानंतर पालकमंत्रीही बदलण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ जिल्ह्यांसाठी आज पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे बदल केल्याचे स्पष्ट होत आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जागी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती, पालघर, भंडारा, गोंदिया, हिंगोली, वर्धा, बुलडाणा आणि गडचिरोली या आठ जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त केले आहेत. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्याकडे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची अमरावतीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या जिल्ह्याची जबाबदारी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे होती. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालघर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी होती. 

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे हाताळल्याने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याकडे पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे. उद्योग, खनिकर्म, वक्‍फ तसेच अल्पसंख्याक कल्याण राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळातून गच्छंती झालेले माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे हे यापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्याकडे त्यांच्याच म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून वर्ध्याची जबाबदारी काढून त्यांच्या जागी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुधीर मुनगंटीवार यांची आता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर या जिल्ह्याची जबाबदारी राज्यमंत्री अमरीशराजे आत्राम यांच्याकडे होती. आठ पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज जारी केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख