state congress meeting in mumbai | Sarkarnama

...म्हणून काँग्रेसच्या उमेदवारीचा निर्णय लवकर घ्या!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 जून 2019

विधानसभेला जिल्हानिहाय काय होऊ शकते याचा धावता आढावा त्या जिल्ह्यातील अध्यक्षांकडून घेतला गेला.

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवारीचा निर्णय लवकर घ्यावा, जेणेकरून संबंधित उमेदवाराला प्रचाराला वेळ मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय लांबला तर त्या उमेदवारांवरही मर्यादा येतात, अशा सुचना मुंबईत झालेल्या कॉंग्रेसच्या बैठकीत जिल्ह्यातील नेत्यांनी केल्या. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीचा आढावा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कॉंग्रेसच्या जिल्हानिहाय बैठका आजपासून मुंबईत सुरू झाल्या. आज कोल्हापूर जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी माजी खासदार जयवंतराव आवळे, कोल्हापुरचे प्रभारी यशवंत हप्पे, प्रदेश सरचिटणीस प्रकाश सातपुते उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात काय झाले याची माहिती प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी घेतली. विधानसभेला जिल्हानिहाय काय होऊ शकते याचा धावता आढावा त्या जिल्ह्यातील अध्यक्षांकडून घेतला गेला. त्यावेळी उमेदवार कोण असेल त्याची नांवे प्रदेशकडे पाठवली जाईल, पण त्यानंतर यावर लवकर निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून संबंधित उमेदवाराला तयारीला वेळ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात आदि उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख