दोन उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव कॉंग्रेसकडून शक्‍य, मंत्रिमंडळात दोन्ही कॉंग्रेसचा सहभाग ?

दोन उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव कॉंग्रेसकडून शक्‍य, मंत्रिमंडळात दोन्ही कॉंग्रेसचा सहभाग ?

नवी दिल्ली : सत्तास्थापनेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी कॉंग्रेसच्या आमदारांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवला आहे. सत्तेत सहभागी न झाल्यास कॉंग्रेस फुटीची आमदारांनी व्यक्त केल्याचे कळते. दरम्यान, सरकार बनविण्यासाठी किमान समान, मंत्रीमंडळात समान वाटा (14 मंत्रीपदे), विधानसभा अध्यक्षपद आणि शक्‍य झाल्यास उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्रीपद, असा प्रस्ताव कॉंग्रेसकडून पुढे करण्यात आल्याचे समजते. उद्या सकाळपर्यंत अहमद पटेल "सोनिया संदेश' घेऊन जयपूरला पोहोचतील, असेही सांगितले जात आहे. 

भाजपकडून होणाऱ्या संभाव्य फोडाफोडीच्या भीतीमुळे कॉंग्रेसने आपल्या सर्व आमदारांना जयपूर येथे हलविले आहे. राज्यपातळीवर सर्व नेते तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे हे देखील जयपूरला असून तेथेच त्यांची आमदारांशी चर्चा केली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील जयपूरला पोहोचले आहेत. पक्षाच्या 44 पैकी तब्बल चाळीस आमदारांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत हात मिळवणी करावी यासाठी आग्रही आहेत. याबाबतची प्राथमिक चर्चा काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान झाली होती. परंतु, सोनियांनी हा निर्णय प्रलंबित ठेवला होता. अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए. के. ऍन्टनी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचाही या प्रस्तावाला पाठिंबा असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधींचे मन वळविण्याचे प्रयत्न या नेत्यांचे सुरू आहेत. तर, आमदारांचे म्हणणे आणि राज्यातील नेमकी परिस्थिती सांगण्यासाठी माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे दिल्लीत असून ते पक्ष खजिनदार अहमद पटेल यांच्या संपर्कात आहेत. सोनिया गांधींकडून होकार मिळाल्यानंतर अहमद पटेल हा संदेश घेऊन जयपूरला जातील असे समजते. तर औपचारिक निर्णयाची चर्चा आणि घोषणा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या आगामी भेटीत होईल. 

सरकारमध्येच सहभागी व्हावे असा आग्रही कॉंग्रेसच्या आमदारांचा आहे. केवळ बाहेरून पाठिंबा देण्याचा पक्षादेश झाल्यास नाईलाजास्तव मान्य केला जाईल. परंतु त्यानंतर पक्षफुटीची शक्‍यता वाढेल, अशी भीतीही आमदार बोलून दाखवत आहेत. अर्थात, कॉंग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेने भाजपशी नाते तोडावे आणि एनडीएमधून बाहेर पडण्याची घोषणा करावी आणि कडव्या हिंदुत्ववादाऐवजी किमान समान कार्यक्रम बनवून सरकार चालवावे, असे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारी, विकास यासारखे मुद्देही कॉंग्रेसने पुढे केले आहेत. केंद्रात मंत्रीपद सोडून लोकसभेमध्ये विरोधी पक्षात बसण्याची तयारी शिवसेनेला करावी लागेल, असेही कॉंग्रेसचे म्हणणे असल्याचे कळते. 

दरम्यान, सत्तेत समान वाटा घ्यावा असेही कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री व 42 मंत्री अशा मंत्रीमंडळात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रमाणेच कॉंग्रेसलाही किमान 14 मंत्रीपदे मिळावीत. तसेच विधानसभा अध्यक्षपदी कॉंग्रेसलाच मिळावे, ही पूर्वअटही कॉंग्रेसची असल्याचे कळते. सरकारच्या स्थैर्यासाठी दोन उपमुख्यमंत्र्यांचा प्रस्तावही कॉंग्रेसच्या मंडळींकडून पुढे करण्यात आल्याचे समजते. उत्तर प्रदेशात भाजपने दोन उपमुख्यमंत्री केले आहेत. त्यामुळे राज्यात सरकारच्या स्थैर्यासाठी दोन उपमुख्यमंत्री बनविण्यास हरकत नसावी, असे कॉंग्रेसचे महणणे आहे. 

पदांसाठी चढाओढ! 
सरकार सुरळीत चालण्यासाठी तिन्ही पक्षांची समन्वय समिती असावी, असा सूचना कॉंग्रेसची असून कॉंग्रेसने विधानसभाध्यक्ष पदासाठीही या पक्षाने आग्रह धरला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव विधानसभाध्यक्षपदासाठी पुढे असल्याचे समजते. याखेरीज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विधीमंडळ पक्ष नेतेपद सोपविले जाऊ शकते. विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात मंत्रीमंडळात वर्णी लागल्यास विजय वडेट्टीवार यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते, असेही कॉंग्रेसमध्ये बोलले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com