सत्ताधारी आणि आयुक्त मुंढेंच्या संघर्षात स्थायी समितीच्या ओएसडीची बदली? - Standing Committee OSD of Nagpur Transferred | Politics Marathi News - Sarkarnama

सत्ताधारी आणि आयुक्त मुंढेंच्या संघर्षात स्थायी समितीच्या ओएसडीची बदली?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 मार्च 2020

भाजप सत्तेत आल्यापासून एका वर्षाचा अपवाद वगळता गेल्या एका तपापासून स्थायी समिती अध्यक्षांचे ओएसडी असलेले प्रफुल्ल फरकासे यांची आज मनपा प्रशासनाने धंतोली झोनमध्ये बदली केली

नागपूर : भाजप सत्तेत आल्यापासून एका वर्षाचा अपवाद वगळता गेल्या एका तपापासून स्थायी समिती अध्यक्षांचे ओएसडी असलेले प्रफुल्ल फरकासे यांची आज मनपा प्रशासनाने धंतोली झोनमध्ये बदली केली. त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे स्थायी समिती अध्यक्षांची कोंडी होणार असून समितीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्‍यता सुत्रांनी व्यक्त केली. आयुक्त व सत्ताधाऱ्यांतील संघर्षामुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेत एकाच पदावर अनेक वर्षे असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केली. यात स्थायी समिती अध्यक्षांच्या ओएसडीचाही समावेश असून प्रफुल्ल फरकासे यांना आज धंतोली झोनमध्ये बदली झाल्याचे पत्र मिळाले. त्यांना तत्काळ धंतोली झोनमध्ये रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तत्पूर्वी सोमवारी आयुक्तांनी फरकासे यांना बोलावून घेतले होते. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर प्रफुल्ल फरकासे यांना स्थायी समिती अध्यक्षांचे ओएसडी म्हणून मुख्यालयात आणण्यात आले होते. 

गेली बारा वर्षातील एका वर्षाचा अपवाद वगळता ते सातत्याने स्थायी समिती अध्यक्षांचे ओएसडी म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांची कनिष्ठ अभियंता म्हणून पदोन्नतीही झाली होती. मात्र ते स्थायी समिती अध्यक्षांना सेवा देत होते. आयुक्त व सत्ताधाऱ्यांतील संघर्षामुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या बदलीमुळे आयुक्त व सत्ताधाऱ्यांतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

फरकासे यांच्यासह चार जणांची आज बदली करण्यात आली. आयुक्त कार्यालयातून दोघांची बदली करण्यात आली. यात जाधव यांची कर विभागात बदली करण्यात आली तर वित्त विभागातील धकाते यांची आयुक्त कार्यालयात बदली करण्यात आली.

नव्या स्थायी समिती अध्यक्षांपुढे आव्हान

प्रफुल्ल फरकासे गेली अनेक वर्षे स्थायी समितीचा अर्थसंकल्प तयार करीत होते. किंबहुना अर्थसंकल्प तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. येत्या शुक्रवारी, ६ मार्चला नव्या स्थायी समितीच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. पिंटू झलके नवे स्थायी समिती अध्यक्ष होणार आहेत. त्यांचा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वीच फरकासे यांची बदली झाल्याने झलके यांच्यापुढे अर्थसंकल्प तयार करण्याचे आव्हान उभे राहणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख